उज्जैन महाकालेश्वर मंदिरात आरतीसमयी आग

0

भस्म आरतीदरम्यान 13 जण जखमी

उज्जैन, 25 मार्च  : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीच्या वेळी उधळलेल्या गुलालामुळे गर्भगृहात आग लागली. या प्रकारात पुजारी
आणि भाविक असे 13 जण भाजले.
या घटनेची दखल घेत मंदिराचा नंदी हॉल रिकामा करून भस्म आरतीत सहभागी झालेल्या भाविकांना बाहेर काढण्यात आले. मंदिराच्या गभाऱ्यात आग लागल्याचे समजताच भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.

यानंतर जिल्हा रुग्णालयातून तत्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारानंतर चौघांना इंदोरला पाठवण्यात आले. तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत.

आरतीदरम्यान गुलाल उधळल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झाला त्यावेळी मंदिरात हजारो भाविक महाकालसोबत होळी साजरी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी गर्भगृहात आरती करत असताना मागून कोणीतरी पुजारी संजीव यांच्यावरही गुलाल उधळला. हा गुलाल त्यांच्या हातातील आरतीच्या दिव्यावर पडला. गुलालातील रासायनिक पदार्थांमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. गर्भगृहातील चांदीच्या आवरणाला रंगापासून वाचवण्यासाठी केलेले उपायही आगीचे कारण ठरू शकतात, अशी चर्चा आहे.

काही जणांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले संजीव पुजारी, विकास, मनोज, सेवाधारी आनंद, कमल जोशी यांच्यासह 13 भाविकांना आगीचे चटके बसले.

उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितले की, 13 जण भाजले असून चौघांना उपचारासाठी इंदोरला पाठवण्यात आले आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे. उर्वरित जखमींवर उज्जैनच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी बाबा महाकाल यांची प्रार्थना करतो, असे अमित शाह यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech