शिव होऊन शिवोपासना करा!

0

भगवान शंकर ज्ञानाची देवता आहे. त्यांच्या मस्तकातून वाहणारी गंगा ही ज्ञानगंगा म्हणून ओळखली जाते. शिव हे ज्ञानाचे राजे आहेत. शंकराचा भक्त हा ज्ञानाचा उपासक असला पाहिजे. त्याची ज्ञान तृष्णा पराकोटीची असली पाहिजे तरच तो शिवभक्त होय. शिवाची उपासना करणाऱ्या ज्ञानी माणसाची बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र असते. जीवनाच्या कठीण समस्येतून आपण यशस्वी होऊ शकतो हा विश्वास ही हिंमत शिवभक्तात असते.

भगवान शंकर यांचे वास्तव्य कैलास पर्वतात आहे. याचा अर्थ ज्ञानाची बैठक शुद्ध आणि धवल असली पाहिजे. चारित्र्याची बैठक शुद्ध असेल तरच ज्ञान शोभून दिसते. असा संदेश आपल्याला भगवान शंकर देतात.

कैलास पर्वत म्हणजे ज्ञानाचे उत्तुंग शिखर आहे. या उत्तुंग शिखरावर बसून भगवान शंकर समस्त मानवी समाजाचे कल्याण करण्यासाठी तत्पर आहेत. मानवी समाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी हलाहल विष प्राशन केले असा एकमेव देव म्हणजे महादेव! म्हणूनच भगवान शंकर यांना महादेव ही उपाधी शोभून दिसते. भगवान शंकर आपल्याला सांगतात कल्याणाचा मार्ग हा साधा सरळ नाही तर तो काट्यांनी भरलेला आहे. खडतर साधना केल्याशिवाय शिवतत्त्व प्राप्त होत नाही. हेच महादेव आपल्याला भक्तांना समजावत आहेत.

भगवान शंकर ही ज्ञानाची देवता आहे. भगवान विष्णू ही भक्तीची देवता आहे. भगवान विष्णू शंकराची पूजा करत असताना सहस्रकमळे अर्पण करत होते. त्यावेळी एक कमळ कमी पडले म्हणून त्यांनी स्व-नेत्र शिवाला अर्पण केले. याचा अर्थ ज्ञानाला भक्तीचा नेत्र असला पाहिजे. म्हणजेच ज्ञानदृष्टीला भक्तीची दृष्टी प्राप्त झाली तर जीवनाला परिपूर्णता येते. भक्ती वाचून असलेले ज्ञान बलहीन आहे तर ज्ञानावाचून असलेली भक्ती दृष्टीहीन आहे. ज्ञान विश्लेषण करते तर भक्ती समन्वय साधते. म्हणजेच ज्ञान विश्लेषण करून तत्त्वाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. भक्ती समन्वय साधून सौंदर्य शोधून काढते. याचाच अर्थ शिवभक्ताला ज्ञान आणि भक्तीचा नेत्र असला पाहिजे, दृष्टी असली पाहिजे तर तत्त्वज्ञानात रममाण होऊन सुद्धा सौंदर्याचा उपभोग घेता येतो.

भगवान शंकरांनी सर्वांगाला विभूती का फासली आहे?

शंकर ही ज्ञानाची देवता आहे. हे ज्ञान विशुद्ध आणि धवल आहे. विशुद्ध आणि धवल ज्ञान विभूतीलाच वैभव मानते. असा संदेश देण्यासाठी भगवान शंकरांनी अंगाला भस्म लावले आहे.

भगवान शंकरांच्या हातात असलेला त्रिशूल सज्जनांना संरक्षणाचे आश्वासन देतो तर दुष्ट दुर्जनांना धाक दाखवतो. भगवान शंकर यांना भोलानाथ असे म्हणतात. काहीजण भोलानाथ याचा अर्थ भगवान शंकर भोळे आहेत आशा लावतात. वास्तविक भोलानाथ याचा अर्थ साध्या भोळ्या लोकांचा नाथ असा आहे. साध्या भोळ्या लोकांचे दुष्टांपासूनू संरक्षण करणारी देवता म्हणजे भगवान शंकर आहेत. म्हणूनच त्यांना भोलानाथ म्हटले जाते.

भगवान शंकरांच्या हातातला डमरू हे संगीताचे प्रतीक आहे. सृष्टीमधील विविध प्रकारच्या रहस्यांची उकल भगवान शंकर डमरू वाजवून करत असतात. आद्य व्याकरणकार पाणिनी यांना व्याकरणाचा बीजमंत्र भगवान शंकरांनी डमरू वाजूनच दिला.

भगवान शंकर यांनी हलाहल प्राशन केले. ते विष प्राशन केल्यावर त्यांनी ते कंठातच धारण केले. याचा अर्थ संपूर्ण सृष्टीला आणि समाजाला हानिकारक असणारे विचार मस्तकात जाऊ द्यायचे नाहीत. तसेच ते अंतःकरणातही जाऊ द्यायचे नाहीत. दुष्ट अपरिपक्व विचारांमुळे बुद्धी आणि अंत:करण मलीन होऊ द्यायचे नाही हा संदेश नीलकंठ या शब्दातून आपल्याला सांगितला जात आहे.

मस्तकातून ज्ञानाची गंगा वाहिली पाहिजे. शिवभक्ताचे चारित्र्य कैलासासारख्या धवल शिखरासारखे उत्तुंग आणि विशुद्ध असले पाहिजे. शिवभक्ताने साधेपणाचा शृंगार करून विभूतीला वैभव मानले पाहिजे. सज्जनांचे रक्षण आणि दृष्टांचा संहार हेच शिवभक्ताचे जीवनव्रत असले पाहिजे. मानवी समाजाच्या आणि जीवसृष्टीच्या कल्याणार्थ प्रसन्नतेने विषप्राशन करण्याचे सामर्थ्य शिवभक्तात असणे आवश्यक आहे. कारण शिवाची उपासना करणारा भक्त हा शंकरासारखाच असला पाहिजे. कारण शिवाची उपासना आपण स्वतः शिव होण्यासाठीच करायची असते. तरच ती फलद्रूप होते. अन्यथा शिव उपासनेला अर्थ राहत नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech