मुंबई – एकीकडे जेस्म अँडरसन निवृत्त होत असतानाच इंग्लंडच्या एका २६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गस ऍटकिन्सन असं त्याचं नाव असून त्याने पहिलाच कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळताना मोठा कारनामा केला आहे.
लॉर्ड्सवर इंग्लंडने शुक्रवारी (१२ जुलै) वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि ११४ धावांनी विजय मिळवला. हा सामना ऍटकिन्सनचा पदार्पणाचा कसोटी सामना होता, तर जेस्म अँडरसनचा कारकिर्दीत १८८ वा आणि अखेरचा कसोटी सामना होता.
ऍटकिन्सन या सामन्यात इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने या सामन्यात पहिल्या डावात १२ षटकात ४५ धावा खर्च करताना ७ विकेट्स घेतल्या. तसेच दुसऱ्या डावात १४ षटकात ६१ धावा खर्च करताना त्याने ५ विकेट्स घेतल्या, म्हणजेच दोन्ही डावात मिळून त्याने १२ विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा गस ऍटकिन्सन इंग्लंडचा ९० वर्षातील म्हणजेच १९३२ नंतरचा पहिलाच गोलंदाज आहे. तसेच १९७२ पासून असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज आहे. यापूर्वी १९७२ साली ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज बॉब मस्सी यांनी लॉर्ड्सवरच पदार्पणात इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या.