डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ‘अबकी बार ४०० पार’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होणे गरजेचे असून त्यासाठी पुढील २० दिवस महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून काम करावे, असे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली जिमखाना येथे महायुतीच्या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभांच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खासदार शिंदे बोलत होते.
आपल्याला कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतून नेहमीच मताधिक्य मिळते, पण यंदा शिवसेना-भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे सुद्धा असल्याने हे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवायची असल्याचे सांगत देशात गेल्या १० वर्षात मोठा बदल झाल असून गेल्या २ वर्षात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे खासदार शिंदे यावेळी म्हणाले. कल्याण लोकसभेतही मोठ्या प्रमाणात निधी आला असून त्यातून एमआयडीसी भागातल्या रस्त्यांसह सर्वच रस्ते डांबरमुक्त, खड्डेमुक्त होणार आहेत. डोंबिवली माणकोली पूल खुला झाला कल्याण शीळ रोडचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. आता रिंग रोड, काटई ऐरोली फ्री वे यासह मेट्रोचे कामही प्रगतीपथावर असून त्यामुळे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २७ गावांसाठी राज्य सरकारने करमाफीचा निर्णय घेतला. संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी आरक्षण बदलले असून कल्याणमध्ये लवकरच भव्य स्मारक उभारले जाणार आहे. तर बेतवडे इथे आगरी कोळी भवन उभारण्याचे कामही प्रगतीपथावर असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या सगळ्या कामाच्या जोरावर ‘अबकी बार ४०० पार’ हे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्यासाठी काम करायचे असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. श्री. रवींद्र चव्हाण साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी, महिला जिल्हा संघटक लता पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी महापौर विनिता राणे, तालुकाप्रमुख महेश पाटील, भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती राहुल दामले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यासह महायुतीतील घटकपक्षांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
—–