विठ्ठलवाडी ते कल्याण – मुरबाड हायवे उन्नत मार्गाने जोडणार… एमएमआरडीए ने काढले 342 कोटींचे टेंडर

0

(टीम ठाणेकर)
उल्हासनगरः कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी आता अवघे पाच मिनीटे लागणार आहेत. कारण विठ्ठलवाडी येथून जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्गाची उभारणी केली जात असून त्यासाठीची निविदा नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या मार्गासाठी आग्रही होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अवघ्या काही महिन्यात हा रस्ता मार्गी लागला आहे. या मार्गामुळे ४० मिनीटे ते एक तासांचा प्रवास फक्त पाच मिनिटांवर येणार आहे. दोन रेल्वे मार्गिका ओलांडून वालधुनी नदीला समांतर या मार्गाची उभारणी केली जाते आहे. या कामासाठी ६४२ कोटी ९८ लाखांची मान्यता मिळाली आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका..

कल्याण लोकसभा मतदारसंघात रस्ते, उड्डाणपूल आणि उन्नत मार्गांच्या माध्यमातून कोंडी मुक्त वाहतूक देण्याचा प्रयत्न कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करत असतात. त्याच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गिकेचा शुभारंभ झाला. ऐरोली काटई मार्ग, रिंग रोड आणि रस्त्यांचे रूंदीकरण केले जाते आहे. माणकोली मोठागाव उड्डाणपूल, शिळफाटा उड्डाणपूल, शिळफाटा रस्ता असे अनेक महत्वाचे प्रकल्पही पूर्णत्वास जात आहेत. कल्याण हे तालुक्याचे शहर असून अनेक शहरांना जोडणारे केंद्र आहे. अनेक महामार्ग या कल्याण शहराच्या शेजारून गेले आहेत. सध्याच्या घडीला कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातले प्रवासी वाहन चालक भिवंडी, ठाणे आणि मुंबईत जाण्यासाठी कल्याण शहरातून प्रवास करतात. त्यामुळे कल्याण शहराचे प्रवेशद्वार कोंडीत अडकते. यावर उपाय म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनापुढे जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून विठ्ठलवाडी ते थेट कल्याणच्या अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी उन्नत मार्गाची संकल्पना मांडली होती. एमएमआरडीएने तात्काळ त्याला मंजुरी देत त्याचे सर्वेक्षण करून भूसंपादन सुरू केले होते. या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जागाही संपादित करण्यात आली. आता या मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून निविदा जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरूवात होणार असून हा मार्ग पूर्ण झाल्यास त्याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे.

असा आहे हा मार्ग
कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर पाम्स वॉटर रेसॉर्ट ते कल्याण बदलापूर रस्त्यावर जगदीश दुग्धालय ते जुना पुणे लिंक रस्त्यापर्यंत वालधुनी नदीला समांतर हा उन्नत मार्ग उभारला जातो आहे. हा मार्ग कल्याण कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि पुढे कल्याण कसारा रेल्वे मार्ग ओलांडून जाणार आहे. अहमदनगर मार्गावर ८०० मीटरच्या तर पुणे लिंक रस्त्यावर ७०० मीटरच्या दोन येणाऱ्या जाणाऱ्या मार्गिका असतील. संपूर्ण मार्गाची लांबी १९०० मीटर असेल. तर एकूण मार्गात ३४०० मीटरचे बांधकाम होईल. कल्याण बदलापूर राज्यमार्गावर उतरण्यासाठी मार्गिका असतील. त्याच्या आरेखन आणि बांधकामासाठी एमएमआरडीएने निविदा मागवली आहे. सुमारे अडीच किलोमीटरचा हा मार्ग कल्याण शहरात होणारी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

उन्नत मार्ग महत्वाचा

सध्याच्या घडीला वालधुनी, विठ्ठलवाडी परिसरातून प्रवास करत शहाड भागात जाणे तितकेसे सोपे नाही. जुना कल्याण पुणे लिंक रस्ता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरातून शहाड परिसरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र आता या मार्गामुळे थेट रस्ता उपलब्ध होईल. त्यामुळे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरून थेट कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरच्या पूर्व भागात पोहोचणे सोप होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech