मुंबई : महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्येही जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट जास्त जागा मिळाव्यात म्हणून आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जागावाटप अंतिम करण्यासाठी आणि उमेदवार निश्चितीसाठी महायुतीचे नेते शनिवारी नवी दिल्लीला जाणार आहेत. त्यानंतरच भाजपची राज्यातील उर्वरित उमेदवारांची यादी एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे
महायुतीतील नेत्यांच्या भाजप पक्षश्रेष्ठींशी नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकांमध्ये अंतिम जागावाटप, भाजपच्या उर्वरित जागांची यादी आणि महायुतीत मनसेचा समावेश आदींबाबत शनिवारी किंवा रविवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र त्यात काही अडचणी निर्माण झाल्यास बुधवापर्यंत विलंब होऊ शकतो. त्याआधी विदर्भातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठीच्या जागांचा निर्णय मात्र एक-दोन दिवसांतच होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.