प्रकाश आंबेडकरांचा दावा जरांगेंनी फेटाळला; वंचितला पाठिंबा दिलेला नाहीच

0

जालना – ‘प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली, पण मी अजून वंचित आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. ३० मार्चपर्यंत आमचा निर्णय जाहीर करू,’’ असे स्पष्ट करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंब्याचा केलेला दावा फेटाळला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुसाठी राज्यातील ‘वंचित’च्या ८ उमेदवारांची पहिली यादी आज (दि.२७) जाहीर केली. ‘वंचित’ने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी केली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. जरांगे पाटील यांचा आम्हाला पाठिंबा राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यांचा हा दावा जरांगे पाटील यांनी फेटाळला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमादरम्यान जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील कोणत्याच उमेदवाराला अद्याप पाठिंबा दिला नसल्याचे सांगितले. मराठा समाजासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणार नाही. सगळ्यांशी विचारविनीमय करून भूमिका घेऊ. सरकारने अजून मराठा आरक्षणाचा ठाम निर्णय घेतलेला नाही. मंगळवारी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली.

३० मार्चपर्यंत समाजाचा निरोप येईल त्यानंतर निर्णय जाहीर करू, तोपर्यंत कोणताच शब्द देता येणार नाही, असे त्यांना सांगितलं आहे. त्यानंतरच आमचा उमेदवार ठरणार आहे. सरकारनेच मला राजकारण शिकवलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्याच उमेदवाराला अजून पाठिंबा दिलेला नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech