*ठाणे महानगरपालिका, ठाणे*
माहिती व जनसंपर्क विभाग
*वृत्तविशेष क्र : 225*
दिनांक : 01/05/2024
—————————————————————
ठाणे :महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी ७.१५ मिनिटांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीतांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
ध्वजारोहणानंतर, महापालिका आयुक्त श्री. राव यांच्या हस्ते, आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने, गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. संध्या रामदास पवार, पुष्पा हनुमंत शेलार, छाया सुभाष काकडे, महादेवी साईबान गंधनोर, सुषमा सुदाम पवार, विठ्ठल दामोदर बर्वे, परशुराम दशरथ जाधव, तुषार सदानंद रटाटे, संदीप राम करंजकर, उलिगप्पा रामण्णा शिवलिंग या १० सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
ध्वजारोहण सोहळ्यानंतर, कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना सर्व मान्यवरांनी वंदन केले. तसेच, शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, तुषार पवार, सचिन पवार, शंकर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.