मुंबई – राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपावरुन धुसफूस सुरूच आहे. महायुतीमध्ये सातारा लोकसभेच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना घड्याळ चिन्हावर लढवण्यास अजित पवार गट आग्रही होता.मात्र ही जागा भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच आता साताऱ्याऐवजी सध्या शिंदे गटाकडे असलेल्या नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळहे महायुतीमधून लोकसभा लढवणार असल्याची शक्यता असून भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. भुजबळ हे नाशिकमधून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र अजित पवार यांनी भुजबळ पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पुढील ४८ तासात निर्णय होणार आहे.