लोकसभा निवडणूक, निकाल या सगळ्या राजकारणाच्या धामधुमीत काही गोष्टी पार मागे पडल्या आहेत. अमेरिका आणि कॅरेबियन बेटांमध्ये सुरू असलेला टी २० वर्ल्डकप, त्याचं उदाहरण.
- दिनार पाठक
तुम्ही लवकर उठे लवकर निजे… या सूत्रानुसार जगता की, रात तो अभी बाकी है म्हणून पहाटे कधी तरी झोपता हो? नाही म्हणजे लवकर झोपत असाल, तर गुरुवारच्या रात्री तुम्ही एक जबरदस्त गोष्टीचे साक्षीदार व्हायला मुकलात… जे जागे होते, ज्यांनी ती गोष्ट घडताना पाहिली त्यांची अवस्था मात्र काय करू नि काय नको अशी झाली होती. आता काय घडलं, तेही सांगूनच टाकतो. फार काही नाही, सुरू असलेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान सुपरओव्हरमध्ये हरलं… ही बातमी तुम्हाला गुदगुल्या करत असली, तरी ती अर्धीच झाली. पूर्ण बातमी म्हणजे पाकिस्तान हरलंय ते… चक्क… अमेरिकेकडून!
हे ऐकल्यावर एका मित्राची प्रतिक्रिया होती, अमेरिका क्रिकेट खेळते???
नक्कीच. अमेरिका क्रिकेट खेळते, तिकडेही लीग क्रिकेट चालतं आणि अनेक नामवंत खेळाडू त्या लीगमध्ये खेळतात, हे अनेकांना माहिती नसेल. आता मात्र पाकिस्तानसारख्या वलयांकित संघाला हरवल्याने अमेरिकेच्या संघाची चर्चा सुरू झाली आहे.
अमेरिका-पाकिस्तान सामना झालाही खूपच चुरशीचा. पाकिस्तानने ७ बाद १५९ धावा केल्यावर मोहम्मद आमिर, शाहीनाशह आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शादाब अहमदसारख्या गोलंदाजांसमोर अमेरिका किती धावांपर्यंत जाऊ शकेल, अशीच चर्चा सुरू झाली होती. पण कसलेल्या, अनुभवी फलंदजांप्रमाणेच खेळत अमेरिकेने फक्त ३ गडी गमावून बरोब्बर १५९च धावा केल्या. नियमांनुसार सामना सुपरओव्हरमध्ये गेला. पण खरं तर अमेरिकेने फक्त ३ गडी गमावून पाकिस्तानची धावसंख्या गाठणं हेच प्रचंड कौतुकास्पद होतं. अमेरिकेसाठी जणू मॉरल व्हिक्टरीच! मनोबल उंचावलेल्या अमेरिकेने मग सुपरओव्हरमध्ये पहिली बॅटिंग करताना १८ धावा चोपल्या. मग सौरभ नेत्रावळकरने अमेरिकेसाठी बॉलिंग करताना पाकिस्तानला १३ धावांपर्यंतच मजल मारू दिली आणि हा सामना अमेरिकेने ५ धावांनी जिंकला…
या पराभवामुळे पाकिस्तानी संघाच्या तयारीपासून फॉर्मपर्यंत अनेक गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंच आहे. त्यातच रविवारी त्यांचा सामना टीम इंडियाशी होतोय. हा सामनाही गमावला तर पाकिस्तानी संघाचं मनोधैर्य रसातळालाच जाईल. अर्थात जर-तरच्या गोष्टींत काही अर्थ नाही. या क्षणी पाकिस्तान अमेरिकेशी हरलंय आणि जिव्हारी लागावा असा हा पराभव ठरलाय. कारण लिंबू-टिंबू मानल्या जाणाऱ्या अमेरिकेने सामना ज्या पद्धतीने जिंकलाय, ते पाहता पाकिस्तानच लिंबू-टिंबू आहे, असं चित्र उभं राहिलंय…
अमेरिकेने दोन सामने जिंकले आहेत. अजून एखादा सामना जिंकून बाद फेरी गाठण्यासाठी कॅप्टन मोनांक पटेल आणि त्याच्या सहकाऱ्यांचा नक्कीच प्रयत्न राहील. त्यांच्या संघात चांगले फलंदाज आहेतच. पाकिस्तानवर मिळवलेला विजय त्यांच्या गोलंदाजांचाही जोश वाढवेल, हे मात्र निश्चित!
अमेरिकेच्या संघात भारतीयांचाही सुकाळ
अमेरिकेच्या संघातून मिलिंदकुमार, हरमीत सिंग, कॅप्टन मोनांक पटेल आणि सौरभ नेत्रावळकर हे चौघे भारतीय खेळतात. यातील सौरभ नेत्रावळकर नावातूनच मराठमोळा असल्याचं स्पष्ट होतंय. सौरभ मूळ मालाड, मुंबईचा. भारतात देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी होऊनही अन्य खेळाडूही स्पर्धेत असल्याने त्याच्यासाठी मुंबईच्या रणजी संघाची दारं उघडली नाहीत. त्यामुळे कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स करण्यासाठी सौरभने क्रिकेटला रामराम ठोकून अमेरिकेची वाट धरली. शिक्षण आणि त्यानंतर ओरॅकलमध्ये चांगल्या पदावर नोकरी सुरू झाली, तरी सौरभ शेवटी क्रिकेट ग्राउंडवर पोहोचलाच. लीग क्रिकेट सुरू झालं आणि ७ वर्षं लीग क्रिकेट खेळल्यानंतर अमेरिका संघात जागा हा नियम बदलून ३ वर्षांनंतर अमेरिकेच्या संघात जागा असा बदल झाला. त्याचा फायदा सौरभला झाला आणि त्यानं या संधीचा फायदा कसा उचलला, हे आता स्पष्टच झालंय…