मडगाव- उत्तर गोवा जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या करमळी रेल्वे स्थानकावर ‘लेक व्ह्यू’ रेस्टॉरंट आणि मडगावसह अन्य महत्वाच्या स्थानकांवर ‘रेंट -अ- बाईक’ सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली.
नव्याने पदभार स्वीकारलेल्या संतोषकुमार झा यांनी कोकण रेल्वेच्या भवितव्यासाठी विविध निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून करमळी स्थानक परिसरात ‘लेक व्ह्यू’ रेस्टॉरंट उभारले जाणार आहे.तसेच मडगाव,थिवी, करमळी,काणकोणसह कर्नाटक राज्यातील कारवार,गोकर्ण रोड आणि कुमटा रेल्वे स्थानकावर ‘रेंट -अ- बाईक’ ही सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यासाठीच्या निविदेची अंतिम तारीख १८ जून आहे.या योजनेसाठी संबंधित रेल्वे स्थानकावर दुचाकींना ३०० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.त्याचप्रमाणे मडगाव स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ रेल आर्किडचे काम सुरू आहे. तसेच कोकण रेल्वेला जागतिक स्तरावर नेण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे संतोषकुमार झा यांनी सांगितले.