गिरीश मेहरोल-दिव्यांग बांधवांचा आधारवड मुख्यमंत्र्यांनी केलं गिरीश भाईंचे अभिष्टचिंतन
धर्मवीर दिव्यांग सेनेचे अध्यक्ष गिरीश बिजेंद्री कुंवरपाल मेहरोल यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९८० रोजी बिजेंद्री मातेच्या उदरी झाला अन् जणू ठाण्यात दिव्यांग बंधू-भगिनींचा आधारवड उदयास आला.गिरीशभाई हे लहानपणापासूनच पोलियोग्रस्त असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.तरी देखील हार न मानता मोठ्या हिमतीने शारीरिक अपंगत्वावर मात करत त्यांनी आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल केली आहे.आज ते ठाण्यातील हजारो दिव्यांग बांधवांचे पुनर्वसन करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावत आहेत.
प्रारंभी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एखादा छोटेखानी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.आई-वडिलांवर बोज न बनता स्वावलंबी जीवन जगण्याच्या इच्छापूर्तीसाठी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले.पण लहानपणापासूनच दोन्ही पायांना पोलियो असल्याने त्यांना काम मिळणे अवघड होत होते.तथापि त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाही.म्हणतात ना,”प्रयत्नांती परमेश्वर”. सरतेशेवटी गिरीशभाईंना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून २००३ साली दिव्यांग पुनर्वसनअंतर्गत दिव्यांग स्टॉल मिळाला अन् त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली.आता खऱ्या अर्थानं आई-वडिलांची सेवा करण्याचं भाग्य आपणास लाभलं,याबद्दल गिरीशभाईंना मोठा सुखद दिलासा मिळाला.यासाठी त्यांनी ठाणे महापालिकेचे आभार मानले.
पण एवढं करून गिरिशभाई थांबले नाहीत.केवळ आपलं पुनर्वसन करून चालणार नाही,तर आपल्यासारखे शेकडों बंधू-भगिनी दिव्यांग असल्याने,त्यांना आपला अन् कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणं कठीण जाताहे.या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी देखील आपण सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी करायला पाहिजे,या भावनेतून त्यांनी वाटचाल करण्यास सुरुवात केली.समाजसेवक गिरीशभाई यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत,ठाणे महापालिकेचे तत्कालिन सभागृह नेते अन् आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच तत्कालिन महापौर अन् आत्ताचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिव्यांगांच्या समस्या,अडी-अडचणी सोडविण्यासाठी शिवसेनाप्रणित धर्मवीर दिव्यांग सेना स्थापन करून गिरीशभाईंना अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली.एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक गती मिळाली. यासाठी गिरीशभाईंनी मान्यवरांचे आभार मानले.समाजसेवक गिरीशभाईंचे समाजाला आवाहन केलं आहे की,आम्हाला तुमची सहानुभूती,दया नको,तर तुमचे आम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी आशिर्वाद,मॉरल सपोर्ट अन् सहकार्य हवे.
धर्मवीर दिव्यांग सेनेचे अध्यक्ष गिरीश मेहरोल, सचिव शरद पवार व अन्य कार्यकारणी सदस्यांनी संघटितपणे प्रयत्न करून आजपर्यंत शेकडों दिव्यांग बंधू-भगिनींना न्याय मिळवून दिला.परिणामी आज ठाणे महापालिकेमार्फत दिव्यागांना प्रतिवर्ष २४ हजार रुपयांचे पेन्शन/अनुदान मिळून ते थेट बँकेत जमा होऊ लागल्याने त्यांना मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना दिव्यांग बांधव व्यक्त करताहेत.कृतज्ञतेच्या भावनेतून दिव्यांग बंधू -भगिनींनी गिरीशभाईंना वाढदिवसानिमित्त निरोगी असं दीर्घायुष्य लाभो,यासाठी दुवा-आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. याशिवाय दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे रहाता यावे,या भावनेतून छोटेखानी व्यवसाय करण्याकरिता गिरीशभाईंच्या प्रयत्नातून ठाण्यात दिव्यांग पुनर्वसन अंतर्गत आत्तापर्यंत ३०० हून अधिक स्टॉल वितरित करण्यात आले आहेत.त्यामुळे आज ठाण्यातील दिव्यांगांना एक वेगळी ओळख मिळाली आहे.यासाठी गिरीशभाईसह धर्मवीर दिव्यांग सेनेच्या कार्यकारिणी सदस्यांचे लाभार्थी दिव्यांगांनी मन:पूर्वक आभार मानले.
स्वभावाने मनमिळावू, मितभाषी,कर्तव्यदक्ष प्रामाणिक,निष्ठावान,लहान-मोठा असा भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेऊन जाणारे अन् गोरगरीब दिव्यांगांची सेवा करण्याची आवड असणाऱ्या अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या गिरिशभाईंना त्यांच्या कार्यकर्तुत्वाकडे पहाता, त्यांना ठाणे महापालिकेतर्फे २०१८ साली ठाणे गुणीजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.महत्वाचे म्हणजे गिरीशभाईंना प्रभाग क्रमांक २२ मध्ये स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक पवन कदम अन् माजी उपमहापौर सौ.पल्लवी पवन कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली.जनसामान्यांचे नागरी प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेतल्याचे निदर्शनास आल्याने त्यांची प्रभाग २२ चे उपविभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.त्याचप्रमाणे ठाण्यातील दिव्यांग व्यक्तींच्या हितासाठी तनमनधनाने कार्य करणाऱ्या गिरीशभाईंना ठाणे जिल्हा दिव्यांग निधी नियंत्रण समिती वरही नियुक्त करण्यात आले.त्यातून खऱ्या अर्थानं त्यांना जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली.दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी खासदार नरेश म्हस्केसाहेब यांचे मार्गदर्शन अन् सहकार्य नेहमी मिळत गेल्याने दिव्यांगांचे आर्थिक प्रश्न तसेच व्हील चेअर,तीन चाकी सायकल,जयपूर दिव्यांग बूट आदी तत्सम दिव्यांगांचे साहित्य मोफत मिळवून देण्यात आपण यशस्वी झालो,असे मनोगत गिरीशभाईंनी वाढदिवसानिमित्त व्यक्त केलं.
सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांची दिव्यांग बांधवांबद्दलची कणव,प्रेम, तळमळ,आस्था व निष्ठा पाहून संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गिरीश मेहरोल यांची नुकतीच २०२४ मध्ये राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.यास्तव त्यांचे मनस्वी अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.वास्तवात हीच खरी गिरीशभाईंची दिव्यांग बांधवांसाठी केलेली निःस्पृहसेवेची पावती आहे,असे म्हणणे उचित ठरेल.ठाण्यासह राज्यातील लाखों दिव्यांग बंधू-भगिनींचे आर्थिक,सामाजिक अन् आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी
गिरीशभाईंना आई जगदंबे मोठं बळ देवो,ही तिच्या चरणी प्रार्थना!
जय महाराष्ट्र!
लेखक रणवीर राजपूत, ठाणे
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, डीजीआयपीआर,मंत्रालय