ठाणे – ठाण्यातील तरुणाच्या हत्येप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण 2016 सालचे असून या तिघांवर लुटमार करण्याच्या उद्देशाने एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर असून त्यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश वसुधा भोसले यांनी प्रत्येक आरोपीला 7,500 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या तिघांपैकी कमलेश राजदेव साहनी असे एका दोषीचे नाव आहे. कमलेश हा पालघर जिल्ह्यातील वसईचा रहिवासी आहे. तर, रुपेश रंभू साह आणि मंटू रामधर पटेल हे अन्य दोन आरोपी बिहारचे रहिवासी आहेत.
कमलेश, रुपेश आणि मंटू या तिघांनी 22 नोव्हेंबर 2016च्या रात्री 23 वर्षीय शिवशंकर यांची दगडाने ठेचून हत्या केली. यानंतर तिघांनी शिवशंकर याच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले. हे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर, शिवशंकरची ओळख कोणाला पटू नये यासाठी त्याचा चेहरा दगडाने विद्रुप करण्यात आला, असे सरकारी वकील वर्षा आर. चांदणे यांनी न्यायालयात सांगितले. तिन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच लुटमार आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला. ज्या तरुणाची हत्या करण्यात आली तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता आणि आरोपींनी अत्यंत क्रूरतेने हा खून केल्याचे न्यायाधीश वसुधा भोसले यांनी सांगितले.
एकुलत्या एक मुलाची हत्या करण्यात आल्याने हे नुकसान भरून काढता येणार नाही. आरोपींनी लुटमारीच्या उद्देशाने शिवशंकर यांची हत्या केली आहे. या गुन्ह्यामागे अत्यंत घातक हेतू होता आणि त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारची नरमाई न दाखवता आरोपींना दोषी ठरवणे आवश्यक आहे, असेही न्यायाधीशांनी सांगितले. या प्रकरणात तिघांवरील आरोप सिद्ध करण्यासाठी 23 साक्षीदारांची उलटतपासणी घेण्यात आल्याचे सरकारी वकील वर्षा आर. चांदणे यांनी सांगितले.