कल्याण : डोंबिवलीतील मंगळसूत्र चोरी प्रकरणात रामनगर पोलिसांनी आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील १० जणांना अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याने (मोक्का) दहा वर्षापूर्वी कारवाई केली होती. रामनगर पोलिसांनी या चोरी प्रकरणातील तपासात अनेक त्रृटी ठेवल्या आहेत. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध नसताना त्यांना नियमबाह्य पद्धतीने या प्रकरणात गोवून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केल्याचा ठपका ठेवत ठाणे येथील मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेट्ये यांनी मंगळसूत्र चोरीचा आरोप असलेल्या इराणी टोळीतील दहा आरोपींची मोक्का आरोपातून मुक्तता केली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. संजय मोरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. आरोपींतर्फे ॲड. पुनीत माहिमकर, ॲड. राजय गायकवाड, ॲड. जावेद शेख यांनी काम पाहिले. आरोपींच्या वकिलांनी पोलिसांनी प्राथमिक नोंदणी अहवालात दोन आरोपींचा उल्लेख करून उर्वरित आठ आरोपींचा उल्लेख नसताना त्यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावे नसताना त्यांच्यावर मंगळसूत्र चोरल्याचा ठपका ठेवल्याचे कथानक रचले. या सर्व आरोपींना मोक्का कायद्याने कारवाई केली, अशी माहिती न्यायालयाला दिली. सरकार पक्षातर्फे त्याचा प्रतिवाद करण्यात आला.
मोक्का न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मंंगळसूत्र चोरीचा आरोप ठेऊन त्यांना मोक्का लावलेल्या दहा आरोपींची मोक्का आरोपातून मुक्तता केली. सुटका झालेले दहा आरोपी आंबिवली येथील इराणी वस्तीमधील रहिवासी आहेत. ते कुख्यात इराणी टोळीचे सदस्य आहेत.