गुवाहाटी – वातावरणातील बदल तसेच कामगारांची उत्पादकता अशा कारणांनी आसाममधील बराक व्हॅलीतील २०० वर्षे जुना चहा उद्योग हळूहळू बंद होण्याच्या बेतात आहे. टी असोसिएशन ऑफ इंडिया (टीएआय) चे अध्यक्ष सुशील कुमार सिंग यांनी संघटनेच्या ४९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना हे प्रतिपादन केले.
देशातील, विशेषत: आसाम व कचरमधील चहा उद्योग आता अनिश्चिततेच्या अशा टोकाला आहे की अंशत: बंद होण्याच्या बेतात आहे. एकीकडे आसाम चहा उद्योगाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याचा आपल्याला अभिमान असून आपण हे मोठे यश साजरे करत आहोत. मात्र गेल्या १० वर्षांत कोळसा, खत, गॅस, वीज, मजुरी यांच्यात ८ ते १५ टक्के वाढ आणि दुसरीकडे उत्तर भारतात चहाच्या लिलावातील किंमतीत केवळ ३ टक्केच वाढ झाली आहे.
आसाममधील इतर चहा उद्योग क्षेत्रांच्या तुलनेत स्थळ, मातीचा दर्जा, तसेच इतर महत्वपूर्ण घटकांच्या अनुषंगाने बराक व्हॅली चहा उद्योग हा दुर्गम ठिकाणी स्थित आहे. या भागाची एकुण उत्पादन क्षमता ४०-४५ दशलक्ष किलो, मिळणारी सरासरी किंमत १५० ते १७० रु प्रतिकिलो असताना चहाचे उत्पादन मूल्य १९० ते २०० रु प्रतिकिलो – हे व्यस्तप्रमाण बघता चहा उद्योग हळूहळू कोसळण्याचीच चिन्हे आहेत. सहाजिकच या भागातील चहा बागांची संख्या अल्पकाळातच ११५ वरून १०१ वर आली आहे. तर बराक व्हॅलीतील चहा उत्पादनात २००३ मध्ये ५६.२६ दशलक्ष किलोवरून २०२२ मध्ये ४०.९३ दशलक्ष किलो आणि २०२३ मध्ये ३८.८१ दशलक्ष किलो अशी घसरण दिसून आली. ही आकडेवारी पुरेशी बोलकी असल्याचे सुशील कुमार सिंग म्हणाले.