– दाजी पणशीकर
माझ्या समजुतीप्रमाणे मी जन्माला येताना दोन आवडी किंवा दोन व्यसने घेऊनच आलो ! त्यापैकी एक म्हणजे कवितेची आवड व दुसरे म्हणजे शास्त्रीय गायनाची फार आवड ! या आवडींचे पुढे कळत नकळत व्यसनात कधी रूपांतर झाले ते मला कळालेच नाही. गायनाच्या श्रवण – व्यसनाचा एक महत्त्वाचा लाभ म्हणजे गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा लाभलेला अंतरंग स्नेह !
मी किशोरीताईंच्या गाण्यावर लुब्ध होणे याला तसे महत्व नव्हते. कारण माझ्या आधी लाखो – करोडो श्रोते ताईंच्या गाण्यावर लुब्ध होतेच. सर्वांगाने कमळ विकासत झाले की त्या फुलावर भुंगे झेपावतात हा तर निसर्गाचा नियमच असतो.
पण मला ताईंच्या गाण्यापेक्षा ताईंच्या व्यक्तित्वाचे आकर्षण जास्त होते. या वेळपर्यंत ताईं खूप विक्षिप्त असल्याची चर्चा संगीतविश्वात व संगीतनगरीतील चौकाचौकात खुलेआम चालूच होती. तरीही मला कुतूहल याचे होते, की सगळ्या जगाने विक्षिप्तपणाचा शिक्का माथ्या वर मारल्यानंतरही या गायिकेला गंधर्वनगरीतील ‘तो’ दिव्य व वैश्विक षड़जाचा साक्षात्कार कसा झाला असेल ? त्यांच्यातील तो त-हेवाईकपणा त्या अदभुत साक्षात्काराच्या आड कसा आला नाही ? किशोरीताईंच्या मैफिलीचे तिकीट कितीही महागडे असो, व गाण्याची वेळ पहाटे किंवा रात्रीची असो त्यांची मैफिल श्रोत्यांनी, रसिकांनी नेहमी ’हाऊसफुलच’ असायची हे ठरलेलेच असे !
म्हणून मला ताईंच्या गाण्यापेक्षा त्यांच्या प्रवाही दैनंदिनीत जास्त रस होता ! तुमच्या-आमच्या सारख्या हाडामासाच्या शरीरात असलेल्या ताईंच्या प्रतिभेला दृष्टीच्या, कल्पनेच्या पलीकडच्या विश्वात डोकावण्याची क्षमता कशी आली असेल ? त्या अथांग विश्वाच्या मुळारंभी असलेल्या सप्तसुरांशी ताई कशा संवाद करीत असतील ? प्रत्येक मैफलीसाठी ताई रंगमंचावर जाण्यापूर्वी व्यवहारातील किशोरी आमोणकर असायच्या; पण एकदा का त्यांनी सुरात जुळलेले तानपुरे, व हातातील स्वरमंडलातून शुद्ध स्वरांचा निनाद त्यांनी ऐकला की, मात्र मग त्या व्यवहाराच्या चौकटी तोडून क्षणार्धात अफाट अशा स्वरविश्वात विलीन कशा होत असतील ?
ही लौकिकातून अलौकिकात झेपावण्याची किमया म्हणजे एका अर्थाने, योगीराजांनाही दुर्लभ अशी परकायाप्रवेशाची किमया ताईंना कशी साध्य झाली असेल ?
हाच माझ्या कुतूहलाचा, जिज्ञासेचा, उत्सुकतेचा विषय होता; आणि हाच माझ्या चिंतनाचा प्रवाह शब्दरूपात ‘आदिशक्तीचा धन्याद्गार !’ या ग्रंथात प्रवाहित झाला आहे !
– इति लेखनसीमा ।