प्रियांका गांधी यांनी आता निवडणूक न लढण्याचा निर्णय का घेतला

0

मुंबई : सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. मात्र, काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या निवडणूक लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, प्रियांका गांधी यांनी आता निवडणूक न लढण्याचा निर्णय का घेतला, याबाबत भाष्य केलं आहे.

यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना निवडणूक न लढण्याच्या निर्णय का घेतला, याबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, जर मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता तर मी प्रचारावर लक्ष केंद्रित करू शकले नसते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मी मागील १५ दिवसांपासून रायबरेलीमध्ये प्रचार करते आहे. रायबरेलीशी गांधी घराण्याचे फार जुने संबंध आहेत. त्यामुळे येथील जनतेला प्रत्यक्ष येऊन भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही बाहेर कुठेतरी बसून रायबरेलीत प्रचार करू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.

जर मी आणि राहुल गांधी यांनी एकाच वेळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता, तर आम्हाला आमच्या मतदारसंघात किमान १५ दिवस तरी राहावे लागले असते आणि इतर ठिकाणांच्या प्रचारावर लक्ष्य केंद्रीत करता आले नसते. परिणामी भाजपाचा फायदा झाला असता. म्हणूनच राहुल गांधी यांनी निवडणूक लढवण्याचा आणि मी केवळ प्रचार करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी बोलताना भविष्यात प्रियांका गांधी या निवडणुकीच्या रिंगण्यात दिसतील का? असं विचारलं असता, मी निवडणूक लढवण्याचा अद्याप कोणताही विचार केलेला नाही. मला फक्त पक्षासाठी काम करायचे आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पार पाडायला मी तयार आहे. जर लोकांना वाटत असेल की मी निवडणूक लढवावी, तरच मी निवडणूक लढवेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech