मुंबई- भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना या अभिनेत्रींची नावे घेतली. त्यामुळे व्यथित होऊन अभिनेत्री प्राजक्ता माळीने आज पत्रकार परिषद घेत बीडच्या राजकारणात मला का खेचता ? असा सवाल केला. प्राजक्ता माळीसारख्या अभिनेत्रींना मंत्री धनंजय मुंडे हे हॉटेलवर बोलवतात असा आरोप विधानसभा निवडणुकीच्या काळात करुणा शर्मा- मुंडे यांनी केला होता. त्यानंतर काल आणि आज धस यांनी फक्त माझीच नाही, तर इतर नाव घेतलेल्या अभिनेत्रींचीही माफी मागावी अशी मागणी केली.
अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, गेल्या दीड महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे. पण हतबलता म्हणून मी शांत बसले. मला खोट्या आरोपांचा त्रास होत आहे. लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात, त्यावेळी बोलणे आवश्यक असते. लोकप्रतिनिधी टिपण्णी करतात. यांना लोकांनी निवडून का दिले आहे? हे आपल्यावर चिखलफेक करतात. तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत.
या सर्वात तुम्ही कलाकारांना का खेचता? एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढलेला फोटो ती आमची एकमेव भेट आहे. धन्यवाद हे आमच्यातील एकमेव संभाषण आहे. कलाकारांचा राजकारणाशी संबंध नाही. परळीला कधी पुरुष कलाकार गेले नाहीत का? तुम्हा महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर तिच्या कर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. कष्ट करुन नाव कमावणाऱ्या महिलांच्या नावाची बदनामी का करता? त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी महिलांची नावे घेतली. महिला म्हणून ही बाब मला अतिशन निंदनीय वाटते.
महाराष्ट्रातील नेत्यांना हे शोभत नाही. मी करुणा मुंडे यांना आधीच नोटीस पाठवली आहे. यानंतर त्यांनी काही विधान केले नाही. सुरेश धस यांनी माफी मागितली नाही तर माझ्या वकिलांच्या माध्यमातून मी त्यांना नोटीस पाठवेन. मला खात्री आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोग यावर कठोर कारवाई करतील. जर काही घडले नाही तर मी माझ्या वकिलांमार्फत योग्य ती कारवाई करीन. कलाविश्वात काम करणाऱ्या महिलांच्या वतीने मी लढणार आहे.
मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, तुमचे जे काही घाणेरडे राजकारण आहे ते तुम्हाला लखलाभो. कुठल्याही प्रकारे मराठी कलाक्षेत्रात किंवा नाटक क्षेत्रातील अभिनेत्रींना तुमच्या राजकारणात ओढू नका. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत. मी मराठी कलाक्षेत्रातील कोणत्याही कलाकाराचा अपमान सहन करणार नाही. त्यांनी प्राजक्ता माळीची जाहीररित्या माफी मागावी. या सगळ्याचा निषेध व्हायला पाहिजे.