मंगेश तरोळे-पाटील
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) झालेल्या मतदान पार पडले. मात्र आता उत्सुकता होती निकालाची त्यांची प्रतिक्षा आज शनिवारी संपली असून कोण आपला बालेकिल्ला, गड राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. बहुमतासह सत्ता कोणाकडे जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निकालाआधीच दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून सत्ता येण्याचा दावा केला जात असून मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. आज, शनिवारी लागणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. यासाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज झाली आहे. यात सहा प्रमुख पक्षांसह मनसे आणि अन्य अपक्ष उमेदवारांमध्ये कोण निवडून येणार.
मतदानोत्तर सर्वेक्षणात महायुतीला अधिक फायदा होणार असल्याचे कल मिळत असले तरी, मागील ३० वर्षांतील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ६५ टक्के इतके विक्रमी मतदान झाल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. याचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला हेही कळणार आहे. कारण सत्ता संघर्षानंतर आलेले शिंदे-फडणवीस सरकार आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला विशेषत: भाजपला बसलेल्या फटक्याचे परिमार्जन म्हणून महायुती सरकारने गेल्या तीन-चार महिन्यांत महिलांसाठी लाडकी बहिण, वयोवृद्धांसाठी वयोश्री योजना, तसेच विविध समाज घटकांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करून एकप्रकारे विविध वयोगटातील मतदारांना आकृष्ट करण्याचे काम केले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने मतदार राजा महायुती की महाविकास आघाडी कुणाच्या पारड्यात आपलं वजन टाकतो, हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांची, त्यांच्या वर्चस्वाची, तसेच प्रमुख नेत्यांसाठी प्रतिष्ठा आणि अस्तित्वाची लढाई असणार आहे.शिवाय राज्य सरकारच्या विविध महत्वाकांक्षी त्या योजना मतदारांच्या किती पसंतीस पडल्या हे देखील या निकालातून समोर येणार आहे. याशिवाय मराठा आरक्षण, धार्मिक वाद हे मुद्देही किती परिणामकारक ठरतील, हेही स्पष्ट होईल.