१२ दिवसाचे बाळ घेऊन मातेचे आंदोलन
मुंबई : १२ दिवसाचे बाळ घेऊन मी आझाद मैदानात शेतात मजुरी केलेल्या कामाची मजुरी मिळावी म्हणून न्याय मागण्यासाठी आले आहे. शेतात काम केल्यानंतर जर मला मजुरी मिळत नसेल तर ” सरकारचे अच्छे दिन ” कुठे आहेत ? असा सवाल सीमा काळे या मातेने सरकारला केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सीमा काळे व त्यांच्या सोबत इतर ३० ते ३५ शेतमजूर महिला आपले प्रश्न घेऊन आंदोलन करत आहेत. सीमा काळे यांचे १२ दिवसाचे बाळ या आंदोलनात चर्चेचा विषय ठरला. मैदानातील धूळ व शेजारी सुरू असलेल्या मेट्रो कामाच्या क्रेन चा कर्कश आवाज त्या १२ दिवसाच्या बाळाला सहन होत नव्हता. महिला पोलीस बाळाच्या आईला सांगत होत्या की, बाळाला कशाला घेऊन आला आहात. त्यावर ती माता डोळे पानावत म्हणाली, आम्ही शेतमजूर पारधी समाज कुठेही राहतो. त्यामुळे आझाद मैदान काय किंव्हा रस्त्यावर काय ‘ आम्हाला कुठेही राहण्याची सवय या सरकारने लावली आहे. जिल्हा अहिल्यानगर ( पूर्वीचा अहमदनगर) येथील सचिन भन्साळी, संगीता बोरा, सुदर्शन डुंगरवाल या जमीन मालकांनी आमच्याकडुन शेतात मजुरी करून घेतली मात्र त्याचे मोल दिले नाही. असे सीमा काळे व नटी भोसले यांनी सांगितले. सरकारने जर आम्हाला न्याय दिला नाही तर या बाळाला घेऊन मी व इतर महिला रस्त्यावर बसू असा इशारा दिला.