* शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर घणाघाती टीका
* ‘गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक’ मिशनची घोषणा
मुंबई : खुर्चीसाठी २०१९ साली बाळासाहेबांच्या विचार सोडण्याचे पाप तुम्ही केले. बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले, त्यामुळे स्मारकाबाबत बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे मारक, काय बांधणार स्मारक अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंती निमित्त गुरुवारी संध्याकाळी वांद्रे कुर्ला संकुलनात शिवसेनेने आयोजित केलेल्या ‘शिवोत्सव’ या सोहळ्यात ते बोलत होते. स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला हवी होती, असा टोला शिंदे यांनी यावेळी लगावला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला. अडीच वर्ष पूर्वी आपण केलेला उठाव आणि त्यानंतर मिळालेला देदिप्यमान विजय ऐतिहासिक असून केवळ महाराष्ट्र आणि देशभरात नव्हे तर जगभरात या विजयाची चर्चा आहे. शिवसेनेला मिळालेला विजय हा बाळासाहेबांच्या जयंतीला जनतेकडून मिळालेले मोठे गिफ्ट आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी देखील आपल्या सगळ्यांना शाबासकी दिली असती, असे ते म्हणाले.
आतापर्यंतच्या इतिहासात असा कोणत्याही पक्षाला विजय मिळाला नव्हता. त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. यापुढे दुप्पट वेगाने चौप्पट काम करावे लागेल. त्यासाठी अहोरात्र काम करायला तयार आहे, आपल्या सर्वांच्या साथीने हा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहील, अशी ग्वाही शिंदे यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना दिली.
अडीच वर्ष महाराष्ट्रातील जनतेची मनापासून सेवा करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर राज्यातील २ कोटी ४० लाख बहिणींचा सख्खा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा आहे. हा स्वाभिमान बाळसाहेबांनी शिकवलेला आहे, असे ते म्हणाले. मात्र ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले त्यांना स्मारकाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर केली.
ते पुढे म्हणाले की, काश्मिरमध्ये ३७० कलम हटवला, अयोध्येत राम मंदीर उभारले. बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केले. आता दावोसमध्ये महाराष्ट्रात १५ लाख कोटींचे गुंतवणूक करार झाले. पुढचे वर्ष बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षात शिवसेना घराघरात आणि लोकांच्या मनामनात पोहोचयावयी आहे. गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे आपले मिशन आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सदस्य नोंदणी वाढवा आणि घराघरात शिवसेना पोहोचवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. उबाठाने ९७ लढून २० जागा जिंकल्या आणि शिवसेनेने ८० जागा लढून ६० जागा जिंकल्या. खरी शिवसेना कोणाची हे महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केले असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व खासदारांचा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ, डॉ. निलम गोऱ्हे, मीनाताई कांबळी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शिवसेना नेत्यांचा माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गायक अवधूत गुप्ते आणि सोनू निगम यांच्याकडून बहारदार गाण्यांचा कार्यक्रम करण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करा
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबीज करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असाच लखलखीत विजय मिळवायचा आहे, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. अडीच वर्षात केलेले काम पाहता आपल्याला दोनशे टक्के विजय मिळणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. मनगटात बारा हत्तींचे बळ असलेल्या शिवसैनिकाला काहीच अशक्य नाही, असेही शिंदे म्हणाले.