नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यावर 1 जून 2024 पासून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. यानंतर एनएचआरसीच्या सदस्या विजया भारती सयानी या आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नियुक्तीची आज, सोमवारी घोषणा केली. माजी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यन जून २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आहेत.
माजी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यन यांचा जन्म 30 जून 1958 रोजी झाला आहे. त्यांनी रामकृष्ण मिशनच्या विवेकानंद कॉलेज, चेन्नई येथून रसायनशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर मद्रास लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात सुमारे 23 वर्षे वकिली केली. त्यानंतर 31 जुलै 2006 रोजी त्यांची मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आणि त्यानंतर 9 नोव्हेंबर 2009 रोजी कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर 2016 पासून हैदराबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर 2019 मध्ये त्यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 23 सप्टेंबर 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि जून 2023 मध्ये ते निवृत्त झाले होते.