थींपू- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज भुतानच्या पारो विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. भुतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. यावेळी त्यांनी मोदींची गळाभेट घेतली. ‘मोठे बंधू आपले स्वागत आहे!’ असे उद्गगार त्यांनी यावेळी काढले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गीतावर गरबा न्यृत्य प्रस्तुत करुन त्यांचे स्वागत केले गेले. निवडणूका घोषित झाल्यावर परदेश दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत.
नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भुतान दौऱ्यावर असून आज त्यांच्या स्वागतप्रसंगी त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. भुतानमध्ये नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो या येथील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या बरोबरच भुतानचे राजे जिग्मे वांगचुकही त्यांना कोरोनाकाळातील कामासाठी आणि भारत भुतान संबंध अधिक दृढ करण्यासाठी एका पुरस्काराने गौरवणार आहेत. मोदी यांच्या स्वागतासाठी भुतानमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. भुतानची राजधानी थिंपू मध्येही त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भुतानच्या नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. नुकतेच भुतानचे पंतप्रधान ५ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भुतानभेटीसाठी आमंत्रित केले होते. चीनबरोबर असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत हा नेहमीच भुतानसाठी जवळचा मित्र राहिलेला आहे.