शिर्डी : लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील ४८ पैकी केवळ १७ जागा महायुतीच्या निवडून आल्या होत्या. म्हणजे जेमतेम ३५ टक्के मार्क्स घेऊन आपण काठावर पास झालो होतो. पण, मनातून मात्र नापास होतो, अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलून दाखवली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जसा महायुतीने महाविजय मिळवला, तसाच महाविजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मिळवायचा आहे. येत्या तीन ते चार महिन्याच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, याची तयारी देखील करायची आहे. त्यासाठी आतापासून तयारीला लागा, असं आवाहन देखील फडणवीसांनी केले. शिर्डीत आयोजित भाजपच्या महाविजय प्रदेश अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसह सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
ज्यांच्यामुळे हा भगवा फेटा घालू शकलो, ज्यांच्यामुळे उद्याची पहाट ही कशी असेल हे कुणालाही माहिती नव्हती, तेव्हा शिवरायांना देव, देश आणि धर्म लिहिण्याची प्रेरणा दिली, त्या जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतो, असे म्हणत फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्रात जो महाविजय प्राप्त झाला, त्यासाठी मी साष्टांग दंडवत घालतो. आपल्यामुळे हा विजय मिळाला असल्याचेही म्हणाले. काँग्रेसच्या २२२ जागांचा विक्रम आम्ही मोडीत काढल्याचा दावाही फडणवीस यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर ज्या प्रकारचे प्रयत्न आपण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जो विश्वास आपण निर्माण केला. त्यामुळे विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी २३७ जागा जिंकून महाराष्ट्रात आपण इतिहास तयार केला. विधानसभा निवडणुकीत आपण ८२ टक्के गुण मिळविले आणि भाजप तर ८९ गुण मिळवून मेरीटमध्ये पास झाला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला इतका मोठा विजय मिळाला आहे की, आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात, राज्याच्या निर्मितीनंतर सत्ताधारी पक्षाला मिळालेल्या जागा २२२ होत्या. पण, महायुतीने त्याचाही रेकॉर्ड तोडून २३७ जागा जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला हा विजय आहे, असा दावाही केला.
फडणवीस यांनी सांगितलं की, चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण समाजातील घटकांसाठी सुरू केलेल्या घटना शेवटपर्यंत सुरू राहणार आहेत. संघटनेला सरकारसोबत समर्थन करावं लागेल, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मी हात जोडून विनंती करतो की, आपली संस्कृती इतरांपेक्षा वेगळी आहे. मंत्रालयात समाजातील कामं घेऊन या. विनाकारण येऊ नका. विकासाची कामं करायची आहेत, सामान्य लोकांच्या जीवनातील दु:ख दूर करण्याचं साधन आहे. भारतीय जनता पक्षाची संस्कृती आपण सर्वांनी लक्षात ठेवावी. येत्या काळात भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता एक पारदर्शी चालणारं सरकार आणि त्यामागे हिमालयासारखी उभी असणारी संघटना अशी प्रतिमा करायची आहे.
लोकसभेच्या काळात संविधान विरोधी शक्ती, अराजकता शक्तींचा प्रभाव पाहायला मिळाला. आपल्या विरोधकांना लक्षात आलं की, मोदींजींना पराभूत करता येत नाही. त्यावेळी त्यांनी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या निवडणुकीत आपण त्यांना पूर्ण ताकदीनं पराभूत केलंय. पण त्यांच्या कारयावा संपल्या नाहीत. अलीकडच्या काळात बांग्लादेशी घुसखोर कागदपत्रांसोबत सापडत आहेत. वोट जिहाद सुरू झालंय, त्यामुळं आपल्याला लढाई अजून घट्ट करावी लागेल. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे. एक है तो सेफ है, असा मंत्र मोदीजींनी दिलाय. सगळ्या समाजाला घेवून आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन करायचं असल्याचं फडणवीस म्हणाले.