कल्याणातील राज्यस्तरीय सेमिनारमध्ये पवार यांनी केले आश्वस्त
कल्याण : समाजामध्ये हळूहळू लोकप्रिय होऊ लागलेल्या आणि वैद्यक क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इलेक्ट्रो होमिओपॅथी क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी कटीबद्ध असल्याचे आश्वासन भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिले आहे. इलेक्ट्रो होमिओपॅथीचे जनक डॉ. काऊंट सिझर मॅटी यांच्या २१६ व्या जन्मदिवसानिमित्त इलेक्ट्रो होमिओपॅथी फाउंडेशन महाराष्ट्रच्या माध्यमातून कल्याणात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सेमिनारमध्ये पवार यांनी उपस्थित डॉक्टरांना आश्र्वस्त केले.
इलेक्ट्रो होमिओपॅथीला भारतामध्ये पूर्वीपेक्षा जास्त संरक्षण आणि महत्त्व दिले जात आहे. या उपचार पद्धतीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असून इतर उपचार पद्धतीवर विश्वास ठेवणारेही आता इलेक्ट्रोहोमिओपॅथीकडे वळू लागल्याचे गौरवोद्गारही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी काढले. त्याचसोबत इलेक्ट्रो होमिओपॅथी क्षेत्रासमोर सध्या काही तांत्रिक तर काही शासकीय स्तरावरील अडचणी आणि समस्या आहेत. परंतु महाराष्ट्र राज्य असो की केंद्र सरकार, या दोन्ही ठिकाणी गतिमान आणि कृतिशील असे भाजप सरकार कार्यरत आहे. त्यामुळे इलेक्ट्रो होमिओपॅथी क्षेत्रासमोरील या अडचणी – समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न आणि पाठपुरावा करू असे आश्वासनही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी उपस्थित डॉक्टरांना दिले. इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटनेचे राज्य सचिव डॉ.महेंद्र पवार यांनी यावेळी नरेंद्र पवार यांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
यावेळी भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, इलेक्ट्रो होमिओपॅथीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पी.एस.पांडे, राष्ट्रीय सचिव डॉ.सुरेंद्र पांडे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. प्रदीप तिवारी, सचिव डॉ. महेंद्र पवार, राष्ट्रीय खजिनदार डॉ. बापू पाटील यांच्यासह डॉ. रमेश यादव ( महाराष्ट्र उपाध्यक्ष), डॉ. राकेश तिवारी ( मुंबई अध्यक्ष), डॉ. प्रभाकर विश्वकर्मा (महाराष्ट्र खजिनदार), डॉ. यू.बी. सरोज (पालघर अध्यक्ष), डॉ.त्रिलोकनाथ गुप्ता ( ठाणे शहर अध्यक्ष), डॉ. देवराज पाल ( ठाणे ग्रामीण अध्यक्ष), डॉ. मनोज वाघ ( ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष), डॉ.सुनिल पाटील( ठाणे ग्रामीण सेक्रेटरी) असे २५० ते ३०० सदस्य या सेमिनारला उपस्थित होते.