मुंबई : स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांना ध्वनिआरेखन केलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती केल्या आहेत. त्यांच्या मराठी-हिंदी टीव्ही मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय चित्रपटांतून मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची शैली आहे.
जोगवा, अॅनिमल अशा अनेक चित्रपटांतून दमदार अभिनय केलेले उपेंद्र लिमये आता ‘स ला ते स ला ना ते’ या अनोखं नाव असलेल्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. उपेंद्र लिमये यांनी नेहमीच भूमिकांमधील वैविध्य जपत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं असून, ‘स ला ते स ला ना ते’मध्ये हसनभाईची भूमिका साकरणार असून त्यांची भूमिका काय असणार या विषयी उत्सुकता आहे. वृत्तवाहिनीचा रिपोर्टर आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांची प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोघांच्या उमलणाऱ्या नात्यात अनेक व्यक्तिरेखा येतात. उपेंद्र लिमये यांची भूमिकाही त्यापैकीच एक आहे. एका खाणमालकाची भूमिका उपेंद्र लिमये करत आहेत. त्यामुळे अतिशय वेगळ्या अशा या कथानकावरील ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. आता हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवरीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.