राज्यात दंगली घडवण्याचे उध्दव ठाकरेंचे कारस्थान….?

0

भाजपाचे ज्येष्ठ नेते खा.नारायण राणे यांचा गौप्यस्फोट….
मुंबई – अनंत नलावडे
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत असून राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते खा.नारायण राणे यांनी सोमवारी थेट उद्धव ठाकरे यांचे नाव घेत केला.त्याचवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला.

आज भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खा.राणे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही जोरदार हल्ला चढवला.राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची छायाचित्रे जाणूनबुजून समाज माध्यमांवर प्रसारित करणा-या संजय राऊत यांच्यावरही राज्य सरकारने तातडीनं कारवाई करावी, अशी आग्रही मागणीही खा.राणे यांनी केली.

खा.राणे म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागितली आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी आणि त्याच ठिकाणी शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारतर्फे समित्याही स्थापन करण्यात आल्या असताना विकासाच्या मार्गावर अव्वल ठरत असलेल्या महाराष्ट्रात या ना त्या प्रकारे जातीय तणाव निर्माण व्हावा,रस्त्यावरचा संघर्ष निर्माण व्हावा अशी परिस्थिती निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, असा आरोप करत,मात्र सूज्ञ जनता हा मविआचा मनसुबा उधळून लावेल असा विश्वासही खा.राणे यांनी व्यक्त केला.

मविआ च्या जोडे मारो आंदोलनाचा खरपूस समाचार घेताना खा.राणे यांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी २००४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते या घटनेची आठवण करून दिली.२००४ च्या आणि आजच्या जोडे मारो आंदोलनात जमीन आसमानाचा फरक असल्याचे सांगत खा.राणे म्हणाले की यावेळी उद्धव ठाकरेंच्या शेजारी जोडे मारो आंदोलनात काँग्रेस नेते उभे होते. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींबाबत मात्र हेच उध्दव ठाकरे चकार शब्द उच्चारत नाहीत,आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे तर राज्यातील वातावरण पेटते रहावे यासाठीच प्रयत्न करत असल्याचं आरोपही खा.राणे यांनी केला.अनेक वर्षे मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्रीपदी असूनही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद पवार यांनी काही केले नसल्याची खंतही खा.राणे यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी माजी आ. राज पुरोहित,श्याम सावंत,प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech