राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांची लाट

0

मुंबई – राज्यात एनडीएला २०१४ आणि २०१९ ला निवडणूक जेवढी सोपी गेली, तेवढी यंदाची निवडणूक सोपी नाही. २०१९ मध्ये एनडीएने ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे ४०० पारचा नाराही अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे मत खुद्द अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. महायुतीतील बड्या नेत्यानेच याची कबुली दिल्याने महायुतीसाठी हा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. छगन भुजबळ यांचे संपूर्ण वक्तव्य तुम्ही ऐकले नाही. त्यांनी मांडलेल्या मुद्यातील एखादे वाक्य काढायचे आणि दिवसभर चालवायचे, असे काम मीडिया करत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आपण जिंकतो अशा अफवा सोडल्या तर कार्यकर्ते काम करतील, असे मविआच्या नेत्यांना वाटते. दोन टप्प्यांत राज्यात महायुतीला प्रचंड मतदान झाले. मतदान झालेल्या जागांवर महायुती मोठ्या मताधिक्क्याने जिंकेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, नाशिकच्या जागेवरून भुजबळ यांनी आज पत्रकारांशी बोलताना महायुतीला खोचक टोला लगावला आहे. नाशिकच्या जागेवर माझ्यामुळे अडचण होत आहे, असे वाटले म्हणून मी निवडणुकीतून दूर झालो. आता अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. नाशिक लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. तोपर्यंत तरी महायुतीने येथे उमेदवार जाहीर करावा, असे ते म्हणाले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत माघार घेतलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ समता परिषदेच्या माध्यमातून महायुतीवर दबावतंत्र वापरत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. राज्यभरात ५ जागांवर समता परिषदेचे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते. पाचही पदाधिका-यांनी आपले उमेदवारी अर्ज घेतले आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, दक्षिण अहमदनगर आणि कल्याण या मतसंघातून समता परिषद निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. समता परिषदेच्या आडून भुजबळांचा ओबीसींची ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे का, अशी चर्चा आता रंगली आहे. याबाबत भुजबळ यांनी काही लोक आमचे ऐकणार आहेत, काही ऐकणार नाहीत, अनेक घडामोडी झाल्या त्याचे प्रतिबिंब उमटत असते, असे म्हटले.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech