राज्यात वाघांच्या मृत्यूदरात झपाट्याने वाढ

0

नागपूर : राज्यात पहिल्यांदाच नवीन वर्षाच्या पहिल्या २२ दिवसात ११ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. यातील दोन वाघांची शिकार झाली. दोन बछडे उपासमारीने मृत पावले आहेत. दोन वाघांचे मृत्यू संशयास्पद आहेत. दोन वाघ रेल्वे आणि रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. रेल्वे अपघातात वाघाचा मृत्यू होऊन काही तास उमटत नाही तोच रस्ते अपघातात देखील वाघ मृत्युमुखी पडला आहे. राज्यात वाघांच्या मृत्यूदरात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दोन वाघांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस आल्या. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वनपरिक्षेत्राअंतर्गत गिरड सहवनक्षेत्रात समुद्रपूर-गिरड महामार्गावर धोंडगावजवळ पहाटेच्या सुमारास जड वाहनाच्या धडकेत चार महिन्याच्या मादी बछड्याचा मृत्यू झाला. तर पेंच व्याघ्रप्रकल्पातदेखील पश्चिम पेंचमध्ये नागलवाडी येथे आणखी एका वाघाच्या मृत्यूची घटना समोर आली. मृत वाघ जवळजवळ कुजलेल्या अवस्थेत असल्याने पेंच प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जंगलालगतच्या रेषीय प्रकल्पांवर घेतल्या जाणाऱ्या शमन उपाययोजनांमध्ये वनखात्यासह संबंधित सर्वच खाते कमी पडत आहे. ज्याठिकाणी शमन उपाययोजना केल्या जात आहेत, त्या ज्या पद्धतीने असायला हव्या, तशा होत नाहीत. ठराव होऊन देखील जंगलातून जाणाऱ्या रेल्वेची गती कमी होण्याऐवजी जास्त असते. रेल्वे रुळाच्या बाजूला प्रवाश्यांकडून खाद्यपदार्थांच्या पिशव्या, उरलेले खाद्यपदार्थ टाकतात आणि वन्यजीव त्याकडे आकर्षित होतात त्यामुळे मृत्यूचे प्रमाणाला कारणीभूत ठरत आहेत. वाघांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी असून यातील बरेच मृत्यू हे वनक्षेत्राच्या बाहेर आहेत. वाघांच्या शिकारीचा धोका या मृत्यूतून समोर आला आहेच, पण वनक्षेत्राबाहेरील व्यवस्थापनात खाते कमी पडत असल्याचेही यातून दिसून आले आहे. मृतदेह कुजल्यानंतर वाघाचे मृत्यू समोर येत आहेत. त्यामुळे पर्यटन आणि तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या खात्याची क्षेत्रीय स्तरावरील पकड कमी होत असल्याचे देखील या मृत्युसत्राने स्पष्ट केले आहे. सेवानिवृत्त अधिकारी आणि वाघांच्या कॉरिडॉर, त्यांच्या संवर्धनावर काम करणाऱ्या वन्यजीवप्रेमींनी देखील ही खंत बोलून दाखवली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech