मुंबई : नितेश राणे यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्याचे फोटो शेअर करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही 2005 पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं. पण, आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे, त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते. पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागला नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली, अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यानंतर थेट ठाकरेंवर हल्लाबोल चढवला.
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज झाला. नागपूरच्या राजभवन परिसरात 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. त्यामध्ये, राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. कणकवली मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार बनलेल्या नितेश राणे यांना भाजपने मंत्रिपदावर बसवले. आमदार राणे हेदेखील भगवा कुर्ता परिधान करुनच मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आले होते. शिवसेना पक्ष आणि राणे कुटुंबीयांचा वाद सर्वपरिचित आहे. त्यामुळे, खासदार नारायण राणेंसह नितेश व निलेश राणे हेही सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसून येतात. त्यातच, आता नितेश राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच, त्यांचे भाऊ आमदार निलेश राणेंना शिवसेना युबीटी नेते उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.