जळगाव : जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक बुधवारी संध्याकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. काल ५ च्या सुमारास पाचोऱ्याजवळ पुष्पक एक्प्रेस उभी होती, मात्र तेव्हाच गाडीला आग लागल्याची अपवा पसरली. ती ऐकून घाबरलेल्या काही प्रवाशांनी एक्स्प्रेसमधून खाली उडी मारली आणि समोरून दुसऱ्या ट्रॅकवरून आलेल्या एका रेल्वेने त्या प्रवाशांना उडवलं. त्यामध्ये एकूण १३ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून १२ हून अधिक जखमी आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जळगाव जिल्हा रुग्णालयात सध्या मृतकांचे नातेवाईक जमण्यास सुरुवात झाली आहे. मृतांमध्ये ३ जण उत्तर प्रदेशचे तर चौघे हे नेपाळचे असल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान या अपघातानंतर काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे अपघातातील घटनेमध्ये नेपाळ येथील विश्वकर्मा कुटुंबातील तिघेजण बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. नंदराम विश्वकर्मा , मैसरा विश्वकर्मा आणि हेमू विश्वकर्मा अशी तिघांची नावे आहेत. हे संपूर्ण कुटुंब नेपाळ वरून लखनऊला आलं, त्यानंतर ते लखनऊ येथून मुंबईकडे येत होतं. यात सोबतचे इतर परिवारातील सदस्य हे सुखरूप आहेत मात्र नंदराम विश्वकर्मा त्यांची पत्नी मैसरा विश्वकर्मा व दहा वर्षाची चिमुकली हेमू विश्वकर्मा हे बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. पहाटे पाच वाजेपासून तिघांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आलेले आहेत. मात्र प्रशासनाचे कुठलेही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी नसल्याने बेपत्ता व्यक्तींबाबत कुठलीही माहिती मिळत नाहीये. तिघांचा शोध घ्यावा, त्यांच्या बाबत काही तरी माहिती द्यावी अशी माहिती मयत नंदराम यांचा मोठा भाऊ विक्रम विश्वकर्मा यांनी बोलताना दिली आहे.
रेल्वे अपघातात नेपाळ येथील कमला नवीन भंडारी यांचा देखील मृत्यू झाला आहे. कमला भंडारी या मूळ नेपाळच्या रहिवासी असून त्या मुंबईमध्ये वास्तव्यास होत्या. कमला भंडारी या सासर्यांचा मृत्यू झाल्यामुळे, त्यांची सून राधा भंडारी यांच्यासोबत महिनाभरापूर्वी नेपाळ येथे गेल्या होत्या. परतीच्या मार्गावर असताना त्या नेपाळ येथून लखनऊला आल्या. लखनऊ येथून पुष्पक एक्सप्रेसने मुंबईला घराकडे जात असताना प्रवासात दुर्दैवी घटना घडली. त्यांची सूनबाई एका बाजूने उतरली आणि सासू कमला या दुसऱ्या बाजूने उतरल्या आणि आलेल्या ट्रेनसमोर चिरडल्या गेल्या अशी माहिती राधा भंडारी या सुनेने दिली. कमला भंडारी या त्याच्या सासऱ्याचा नेपाळमध्ये मृत्यू झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी गेल्या होत्या. तेथून पुन्हा मुंबई येथे घराकडे परतत असताना दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मुंबईतून कमला भंडारी यांचा मुलगा तपेंद्र भंडारी हा जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. आम्ही मूळचे नेपाळचे असल्याने आता मृतदेह कधी ताब्यात मिळणार, कसे ताब्यात मिळणार,मृतदेह घेऊन पोहोचायचं कसं असे अनेक प्रश्न मयत कमला भंडारी यांचा मुलगा तसेच सुनबाई यांना पडले आहेत. आईच्या मृत्यूचे, वियोगाचे दु:ख ताजे असतानाच आता त्यांचा मृतदेह घरी कसा न्यायचा हा सध्या त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. कमला भंडारी यांचा मृतदेह घेऊन जाणे संदर्भात प्रशासनाकडून कुठल्याही सूचना मिळालेल्या नाहीत, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात लवकरात लवकर सूचना स्पष्टीकरण द्यावं अशी त्यांची मागणी आहे.