नवी दिल्ली : यंदा २६ जानेवारी २०२५ रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ चित्ररथांना पथसंचलनाची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत महाराष्ट्राला स्थान मिळालेले नाही.तसेच दिल्ली सरकारने यंदा जो चित्ररथाचा प्रस्ताव दिला, तो निकषांतच बसत नसल्याचे कारण देत दिल्लीच्या चित्ररथालाही परवानगी नाकारण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात चित्ररथ निवडण्याबाबत होणारे राजकीय वाद आणि राज्यांकडून दर वर्षी येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन प्रत्येक राज्याला तीन वर्षांतून एकदा चित्ररथ सादर करण्याची संधी मिळेल, असा नियम संरक्षण मंत्रालयाने या वर्षी केला आहे. संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या समितीला हा चित्ररथ पसंत पडला पाहिजे, अशी अटही ठेवण्यात आली आहे. तर पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, झारखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड हरियाणा, आंध्र प्रदेश ही राज्ये आणि दीव-दमण, दादरा आणि नगर हवेली व चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांना परवानगी देण्यात आली आहे.