– योगेश वसंत त्रिवेदी
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जुन १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्या बरोबर सहा वर्षापूर्वी म्हणजे १९६० साली १३ ऑगस्टला बाळासाहेबांनी संपूर्ण व्यंगचित्राला वाहिलेले (जगातील पहिले असं म्हटलं तरी चालेल) ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केलं. स्वतः उत्कृष्ट व्यंगचित्रकार असल्यानं आणि वडील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे उर्फ दादा यांच्या मार्गदर्शन आणि मुशीतून तयार झाले असल्याने त्यांचे कुंचल्याचे ‘फटकारे’ जबरदस्त होते.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना सुरु केली. पण बाळासाहेबांवर होत असलेल्या टीकेचे उत्तर ‘मार्मिक’मधून देतांना त्यांना एकेक आठवडा लागायला लागला. नाही म्हणायला मध्यंतरी त्यांनी श्रीकांतजी, पंढरीनाथ सावंत, विजय वैद्यांना घेऊन ‘सांज मार्मिक’ चा प्रयोग केला. पण तो फार काळ त्यांनी चालविला नाही. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष गेली. शिवसेनेची घौडदौड मुंबई ठाण्याहून पुढे जोरात सुरु झाली.
विलेपार्ल्याची विधानसभेची निवडणुक हिंदुत्वाच्या मुद्यावर गाजली आणि जिंकली. पण हातात दैनिक नव्हते. बाळासाहेबांनी दैनिक सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रबोधन प्रकाशनची सुरुवात केली. दैनिकाचं नांव काय असावं याचा विचार सुरु झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ‘मराठा’ ने जी भूमिका घेतली तशी भूमिका घेणारा चाबुक हाती हवा होता. टीकाकारांना शब्दांच्या आसूडांनी घायाळ करुन दिशा दाखवणारा हवा होता.
सोलापूरच्या वसंत कानडे यांचे ‘सामना’ नावाचे नियतकालिक सुरु होते. बाळासाहेबांनी सुभाष देसाई, ॲड. लिलाधर डाके, गजानन किर्तीकर आदींना सोबत घेऊन कायदेशीर बाबींची पूर्तता करुन ‘सामना’ हे शीर्षक मिळविले. सगळी जमवा जमव झाली. ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक असे भाळी अभिमानाने मिरविणारा ‘सामना’ (सामान्यांच्या मनाचा नादनिनाद) हे दैनिक सुरु करण्याचा निर्णय पक्का झाला. ज्येष्ठ पत्रकार अशोक पडबिद्री यांची कार्यकारी संपादक म्हणून बाळासाहेबांनी निवड केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, स्वातंत्र्य लढा, समाजवादी चळवळ हे सारे अनुभवणारे अशोक पडबिद्री कार्यकारी संपादक होते आणि संपादक अर्थातच बाळासाहेब !
अशोक पडबिद्री हे जवाहरलाल दर्डांच्या लोकमत मधून ‘सामना’ मध्ये आलेले होते. आधी लोकसत्तेत काम केल्यामुळे पडबिद्रींचा मुंबई, औरंगाबाद च्या पत्रकारांशी चांगला संबंध होता. ‘लोकमत’ मधुन त्यांनी नंदकुमार टेणी, रमेश राऊत, डॉ. अनिल फळे यांना मुंबईत आपल्या सोबत आणले आणि मुंबई/सांज तरुण भारत संजय डहाळे तर सांज लोकसत्ता मधून किरण हेगडे यांना सोबत घेतले. तोपर्यंत प्रबोधन प्रकाशनच्या जाहिराती वरुन अनेक जणांनी उमेदवारी नोंदवण्याचा प्रयत्न केला. रीतसर परिक्षा झाल्या. विविध पक्षांसाठी पत्रकारांची निवड झाली. ‘सामना’ करण्यासाठी ‘सैनिक’ सज्ज झाले.
साप्ताहिक ‘आहुति’ मधुन वसंतराव त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संपादक, पत्रकार म्हणुन जून १९७३ मध्ये माझी कारकीर्द सुरु झाली होती. त्याही आधी आहुति चं काम सुरु होतंच. सन्मित्र, ठाणे वैभव, नवशक्ती, मुंबई सकाळ अशा वृत्तपत्रांतून काम करता करता एक दिवस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात बसलो असतांना खिडकीतून ‘अरे योगेश ! आजच्या लोकसत्तातली जाहिरात बघ आणि अर्ज करुन टाक’ असे फर्मान विजय वैद्यांनी सोडले आणि मी पटकन अर्ज केला. परीक्षेस बोलावले आणि परीक्षा दिली, ती उत्तीर्ण झालो आणि श्री. सुभाष देसाई यांचे पत्र आले. दै. ‘सामना’साठी उपसंपादक/वार्ताहर या पदासाठी बाळासाहेबांनी आपली निवड केली असून १५ डिसेंबर १९८८ रोजी शिवसेना भवन येथे मुलाखतीला बोलावले आहे. बाळासाहेबांचा आदेशच होता. १५ डिसेंबर १९८८ रोजी सकाळी शिवसेना भवन गाठले. संजय डहाळे, प्रकाश सावंत, राजेश दर्यापुरकर, रविंद्र राऊळ, सुचिता मराठे (आता करमरकर), सुधा मधुसूदन जोशी, संजय घारपुरे, शिल्पा राजे (आता सरपोतदार), शुभांगी वाघमारे (आता पुणतांबेकर), रविंद्र खोत असे आम्ही शिवसेना भवन हून टॅक्सीने ‘मातोश्री’ वर पोहोचलो. अशोक पडबिद्रींनी सर्वांची ओळख करुन दिली. बाळासाहेबांनी यशस्वी व्हा ! असा आशीर्वाद दिला आणि आम्ही सद्गुरु दर्शनच्या पायऱ्या चढलो.
अशोक पडबिद्री, नंदकुमार टेणी, रमेश राऊत, किरण हेगडे, संजय डहाळे, रविंद्र खोत आणि आम्ही सर्व कंबर कसुन कामाला लागलो. राजकीय, शैक्षणिक, साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा आदी बाबतच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. मंत्रालय, महापालिका, न्यायालय, गुन्हेगारी जगत आदींचे वृत्तसंकलन करण्याबाबत कामे वाटून देण्यात आली. उत्सव, फुलोरा पुरवण्यांची घडी बसवण्यात आली. ‘सामना’ सुरु होण्यापूर्वी त्याच्या डमी अंकाची छपाई करायची होती. विवेक कदम, प्रसाद ठाकूरदेसाई, सुदेश म्हात्रे, संजय वाडेकर, वीणा (रुपाली गोगवेकर) ही मंडळी प्रशासनाची बाजू सांभाळत होती. अनेक जण आपापल्या जबाबदाऱ्या इमाने इतबारे पार पाडत होते.
माझे नाव `बाळ ठाकरे’ च राहणार !
‘सामना’ चे पहिले पान तयार करण्यासाठी आर्ट वर्क बनविण्यात आले. ‘सामना’ शीर्षकाखाली किल्ल्यांच्या बुरुजांवर मधोमध संपादक बाळासाहेब ठाकरे असे तयार करुन आणले होते. सद्गुरु दर्शन मध्ये बाळासाहेब आले होते. संपादक म्हणून त्यांच्या दालनात बसले होते आणि अशोक पडब्रिदी, नंदकुमार टेणी, संजय डहाळे, रवींद्र खोत आणि मी असे समोर उभे होतो. बाळासाहेबांनी आर्टवर्क पाहिले. ते स्वत: चित्रकार, व्यंगचित्रकार, कलाकार आणि कलेची जाण असलेले होते. त्यामुळे त्यांच्या चाणाक्ष नजरेतून त्यांनी ते पाहिले आणि म्हणाले, तुम्ही मला भले बाळासाहेब म्हणत असाल पण संपादक मी आहे आणि संपादक म्हणून माझे नांव बाळ ठाकरे हेच राहणार ! असे म्हणून त्यांनी आपल्या लेखणीने बाळासाहेब या शब्दातला काना आणि साहेब यावर वर्तुळ करुन मुद्रित शोधनातली डिलीट ची खुण केली. तेंव्हापासून ‘संपादक बाळ ठाकरे’ असे छापले जाऊ लागले ते थेट नोव्हेंबर २०१२ पर्यंत २३ जानेवारी १९८९ च्या दिवशी सामना चा पहिला अंक प्रसिध्द झाला. मराठी पत्रकारितेत ज्वालाग्रही जाज्वल्य अभिमानाचे पाऊल दमदारपणे उचलले गेले. 1989 च्या जानेवारीच्या २२ तारखेला रात्री दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात प्रकाशनाचा अभुतपूर्व सोहळा झाला आणि मध्यरात्री १२ च्या ठोक्याला बाळासाहेबांनी ‘सामना’ च्या पहिल्या अंकांचे प्रकाशन धूमधडाक्यात केले. पहिल्या अंकाचे पहिल्या पानावरचं बाळासाहेबांचं अग्रलेखाचं शिर्षक होतं. ‘आता या असे सामन्याला !’ १९८८ सालीच आम्ही सारे ‘बाळकडू’ घेऊन दमदार वाटचाल करीत आहोत. साहेबांना मानाचा मुजरा !
उद्धव राज यांची दालने शेजारी शेजारीच होती
‘सद्गुरु दर्शन’ या प्रभादेवीच्या इमारतीत दै. सामना चा व्याप वाढू लागला. महाराष्ट्राचे ते एक सत्ता केन्द्र बनले. बाळासाहेबांचा ‘मार्मिक’ ‘शिवसेना’ आणि ‘सामना’ हा त्रिशूळ होता. या सद्गुरु दर्शन च्या पहिल्या मजल्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सुभाष देसाई, लिलाधर डाके यांच्याप्रमाणेच शेजारी शेजारी दालने होती. देसाई, डाके, उद्धव ठाकरे हे विश्वस्त होते, तर राज ठाकरे व्यंगचित्रकार ! २८५ भुखंडाचे श्रीखंड हे राज ठाकरे यांचे गाजलेले व्यंगचित्र सद्गुरु दर्शन मध्येच रेखाटण्यात आले होते.
-योगेश वसंत त्रिवेदी – ९८९२९३५३२१
(yogeshtrivedi55@gmail.com)
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. तसेच सामनाचे मुख्य संपादक श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी निवडलेले आणि १५ डिसेंबर १९८८ ते १९ ऑक्टोबर २०१३ पर्यंत अव्याहत सेवा बजावून सामना मधून निवृत्त झालेले पहिले पत्रकार आहेत)