ठाणे : सर्व जग सुखी होऊ दे हा ज्ञानेश्वर माऊलींचा विचार आहे. जगातील अंध:कार दूर व्हावा ही ज्ञानेश्वर माऊलींची आणि त्याचप्रमाणे सद्गुरु श्री वामनराव पै यांची इच्छा आहे. सामान्य बुद्धीच्या सामान्य लोकांसाठी सद्गुरुंनी जीवनविद्येची निर्मिती केली. जगावं कसं हे सांगण्यासाठी जीवनविद्या आहे. पण त्या अगोदर सुख म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आज सगळे लोक पैशाच्याच मागे आहेत म्हणून सद्गुरुंनी सुख म्हणजे पैसा नाही हे सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपुत्र आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाददादा पै यांनी सांगितलं. यासोबतच मन स्वास्थ्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. सत्ता किर्ती कायम राहू शकत नाही, हे सगळं जातं तेव्हा दुःख होतं. त्यामुळे खरं सुख कशात आहे हे समजणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
मार्गदर्शन करताना प्रल्हाद पै यांनी पुढे सांगितले की, आपण सगळ्या गोष्टी गृहित धरायला लागलो आहोत यामध्ये आनंदाचा देखील समावेश आहे. जिथे व्यवस्था आहे तेथे आनंद आहे. म्हणजे सगळीकडेच आनंद भरला आहे. आपल्या ठिकाणी सुद्धा आनंद आहे, मग आपण दुःखी का? असा सवाल यावेळी प्रल्हाद पै यांनी विचारलं. तुम्ही काय बोलता, काय पाहता याला खूप महत्त्व आहे. कारण आपण आपल्या इंद्रियांचा वापर नीट करीत नाही. ज्या दिवशी हे करु तेंव्हा खरा आनंद मिळू शकतो. विचार शक्ती दिली आहे त्यामुळे चांगलाच विचार करणे, चांगले बोलणे हे आपल्याच हातात आहे. सद्गुरु वामनराव पै म्हणतात, तुम्हाला तोंड मिळालं आहे ते चांगलच बोलण्यासाठी, कान दिले आहेत ते चांगले ऐकण्यासाठी. कारण तुम्ही कायम चांगले तेच केले पाहिजे.
आपल्याकडे आनंद भरभरून आहे, त्यामुळे तो वाटला पाहिजे. कारण तो कधीच कमी होणार नाही. आनंदाची भीक न मागता, सुखाची भीक न मागता ते स्वतः बनवू शकता. आनंद वाटा आणि आनंद लुटा, असं यावेळी प्रल्हाद वामनराव पै यांनी सांगितलं. मला सुख हवंय तर ते मलाच मिळवायला हवं. माझ्याप्रमाणे सर्वांना मिळू दे असा मोठा विचार करायला हवा असं देखील प्रल्हाद पै यांनी सांगितलं. जेवढं तुम्ही चांगले बघायला लागाल तेवढं चांगलं चांगलं तुमच्या आयुष्यात व्हायला लागेल, असंही प्रल्हाद पै यांनी सांगितलं. सुखी होण्यासाठी स्वतःला सुधारलं पाहिजे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पण असं करतांना कायम सद्गुरुंना स्मरणात ठेवा. कारण कर्ता तो, करणारा तो परमेश्वर असं म्हणा. कृतज्ञ राहणं अत्यंत गरजेतं आहे, या भावात राहणं गरजेचं आहे.
जीवनविद्या मिशनने ज्ञानेश्वर माऊली यांचा ५६ वा पुण्यस्मरण सोहळा साजरा केला. १० हजारांहून अधिक लोकांनी रेमंड ग्राऊंडमध्ये उपस्थिती लावली होती. एवढंच नव्हे तर जीवनविद्या मिशनच्या युट्यूब लाईव्हवर हजारो लोकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाने झाली. त्यानंतर जीवनविद्या मिशनचे निर्माते सद्गुरु श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या विश्वप्रार्थनेचा २० मिनिटे ‘विश्वप्रार्थना जपयज्ञ’ करण्यात आला. या जपयज्ञाच्या माध्यमातून सकारात्मक विचार लहरी विश्वात सोडण्यात आल्या. यानंतर सारेगमप लिटिल चॅम्पची विजेती गौरी गोसावी आणि सुपरस्टार, छोटे उस्तादचा विजेता राजयोग धुरी या दोघांनी संगीत जीवनविद्येच्या माध्यमातून …. सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन पूजा पवार यांनी केलं.