नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन यांच्या हस्ते आज लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उप बाजारात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ असून कांद्याच्या दराबाबत अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची नितांत आवश्यकता आहे. या प्रक्रिया उद्योगासाठी बाजार समितीने देखील लक्ष घालून या प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दिवसेंदिवस विंचुर उपबाजार आवारावर शेतमाल आवकेत वाढ होत असल्याने बाजार समितीस सध्या असलेली जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बाजार समितीने मौजे सुभाषनगर शिवारातील ८ हेक्टर २१.२९ एकर जागा शासकीय दराने संपादीत करणेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. सदरचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे.लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. ते म्हणाले की, लासलगाव बाजार समिती ही राज्यातील ३०५ बाजार समित्या मधून प्रथम क्रमांक पटकावलेली बाजार समिती आहे. त्यामुळे शेतकरी मापारी कामगार यांचे हित जपण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून काम करावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संचालक मंडळाला केले.
ते म्हणाले की, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क २० टक्के लादलेले आहे. त्याचा परिणाम निर्यातीवर होत असून निर्यात शुल्क शून्य केल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. कांद्याचे दर अनेकदा वर खाली होत असतात. कांदा पूरक व्यवसायाकडे आता शेतकऱ्यांनी देखील वळणे गरजेचे आहे. कांदा पावडर सारखा चांगला उद्योग शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून केला तर इतर देशांमध्ये मोठी मागणी कांदा पावडरला आहे. याकडे या उद्योगाला चालना देण्यासाठी बाजार समितीने विशेष लक्ष देऊन प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात यावी असे त्यांनी सांगितले.