नागपूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मात्र, त्याचवेळी राज्यातील उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला असून होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा देखील आता कमी झाला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उकाडय़ात वाढ होताना दिसून येत आहे. तापमानाचा पारा ज्या गतीने पुढे सरकत आहे, त्यावरून येत्या काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहार या तीन राज्यांत मार्च महिन्यातील तापमान वाढ थेट ४० अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे.