पुणे : शिक्षणासाठी व्यवस्था बाधक नाही तर साधक असायला पाहिजे. शैक्षणिक व्यवस्थेचे स्वरूप केवळ नियमन करणारे असू नये, तर ते शिक्षणासाठी पोषक ठरायला हवे, असे आग्रही मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. पाषाण येथील लोकसेवा ई स्कुलच्या नवीन इमारतीच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षणाचा विषय चौकटीत अडकू नये म्हणून तो समाजाधारित असावा. त्यासाठी समाजाने त्याचे पोषण करावे, अशी भूमिका डॉ. मोहन भागवत यांनी मांडली.
दरम्यान यावेळी बोलतांना “साक्षरता आणि शिक्षण यात फरक आहे. पोट भरणे म्हणजे शिक्षण नाही. तर माणूस होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. माणूस घडविण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. त्यामुळे शिक्षण हा व्यवसाय नसून एक व्रत आहे, सेवा आहे.” नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून राष्ट्राला पाहिजे तसे व्यक्ती निर्माण होईल, अशी आशा सरसंघचालकांनी व्यक्त केली. शांतीलाल मुथा म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर प्रथमच सर्वोत्कृष्ट शैक्षणिक धोरण निर्माण झाले आहे. ज्यातून नवभारत निर्माण होईल. धोरण जरी चांगले असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमनामुळे मूल्य शिक्षण आणि कुटुंब व्यवस्थेसमोर आता अनेक आव्हाने उभी राहत आहेत.” कार्यक्रमाच्या सुरूवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत मान्यवरांना अभिवादन केले. कार्यक्रमाला माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, शास्त्रीय संगीत गायक महेश काळे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, उद्योजक पुनीत बालन, लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक अॅड. वैदिक पायगुडे, माजी संचालक निवेदिता मडकीकर आदी उपस्थित होते.