पुणे : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत संबंध आहेत. यावरून विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि विशेषत: मुंडे यांना लक्ष्य करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात सावित्रीबाई फुले यांना वंदन केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली. पण या योजनमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडेल असे बोलले गेले होते. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, मी मागच्या वेळेस जे बोलले ते तुम्हाला २०२५ मध्ये हळूहळू दिसेल. वित्तीय तूट व्यवस्था हा कायदा अटलजी यांनी आणला होता, त्याबद्दल विचार केला पाहिजे. या क्षेत्रातील अनेक एक्स्पर्ट आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहेत.
आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या टीमवर जे आरोप झाले, त्या काळात त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून योग्य ती पावले उचलली. अहो, कशाला लांब जायचं? काँग्रेसच्या काळात जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, तेव्हा अशोकरावांनीही नैतिकता जपत राजीनामा दिला होता. त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षातील लोकांनीही समाजातील भावना ओळखून योग्य निर्णय घ्यावा. तसेच २४ दिवस झाले हीच स्टोरी आहे. संवेदनशील घटनेच्या बाबत विरोधकांनी सरकारला का सांगायचं, असा सवाल सुळे यांनी सरकारला केला आहे.