जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा कालवश

0

ब्रीच कॅन्डी रुग्णालयात मालवली प्राणज्योत

मुंबई – जगप्रसिद्ध उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.

रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. देशभक्ती, उद्योजकता, धडाडी आणि देशभक्ती या अंगभूत गुणांचे वरदान लाभलेल्या रतन टाटा यांनी 1991 ते 2012 या कालावधीत टाटा समूहाचे अध्यक्षपद भूषविले. टाटा समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. काळाची पावले ओळखून त्यांनी टीसीएस कंपनी सुरु केली. टाटा समूहाच्या एकूण महसुलात या कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. टाटांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय टाटा समूहासाठी फायदेशीर ठरले.

समूहाची घोडदौड सुरु ठेवताना टाटांनी कायमच उच्च कोटीची नैतिक मूल्ये जपली. संवेदनशीलपणा कायम जपणारा, सढळ हस्तानं मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटांची ओळख होती. आयुष्यभर त्यांनी आपली ओळख जपली. टाटा समूहाने कोणताही उद्योग सुरु करताना आधी देशाचा विचार केला. देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी अनेक उद्योग सुरु केले. समूहाची ही परंपरा टाटांनी कायम ठेवली. उच्च नैतिक मूल्य जपण्याचं काम त्यांनी केले. संकटाच्या काळात त्यांनी देशाला कायम साथ दिली. कोणत्याही अडचणीत ते ठामपणे, निर्धाराने उभे राहिले. त्यामुळे ते देशाचे लाडके होते.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech