पुणे : शारीरिक संघर्ष संपला असला तरी मानसिक संघर्ष अद्याप सुरूच आहे. ही चळवळ कायम सुरू राहिली पाहिजे. समजातील विषमता आणि अमानुष वागणुकीच्या विरोधात हा लढा आहे. शौर्यदिनानिमित्त सरकार आपल्या परीने सुविधा पुरवते, मात्र त्या अपुऱ्या पडत आहेत. पुढील वर्षी या सुविधा अधिक चांगल्या होण्याची अपेक्षा आहे. बार्टी सारख्या संस्थांनी यामध्ये लक्ष घालावे. समाजातील विषमता संपविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही आंबेडकर यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन केले. शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो लोकांची उपस्थिती हा संघर्ष जिवंत असल्याचे निदर्शक आहे.
बीड प्रकरण आणि वाल्मिक कराड यांच्या अटक प्रकरणावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, “या प्रकरणाला वेगळा रंग दिला जात आहे. पोलिसांना कराड कुठे होता हे माहीत नव्हते, हे आश्चर्यकारक आहे. गुप्तचर यंत्रणांनी वारंवार आपले अपयश दाखवू नये. कराड प्रकरणी सरकारवर प्रचंड दबाव आहे, मात्र मुख्यमंत्री याला बळी पडू नयेत. हे पोलिस खात्याचे अपयश आहे. आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “सध्याचे केंद्र आणि राज्य सरकार भाजपचे असून त्यांच्यात मतभेद अधिकच वाढत आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तरच ही समस्या सुटू शकते,” असे त्यांनी नमूद केले.