सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार

0

* मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास, सरकारच्या वचनपूर्तीचे रिपोर्ट कार्ड सादर

मुंबई – महायुती सरकार हे काम करणारे सरकार असून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. या कामाची पोचपावती आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार महायुतीला देतील,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी व्यक्त केला. मुंबईत बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत, आ. प्रवीण दरेकर, महायुती समन्वयक आ. प्रसाद लाड आदी उपस्थित होते.

महायुती सरकारच्या कामाचा संक्षिप्त लेखाजोखा सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वचनपूर्तीचा अहवाल सादर करण्यासाठी हिंमत लागते. महायुती सरकारने प्रभाव कामगीरी केली आहे म्हणूनच आम्ही हा अहवाल सादर करत आहोत. महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि महायुती सरकारच्या सव्वादोन वर्षांत केलेल्या कामांची तुलना करत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागली. विकास विरोधी दृष्टीकोन ठेवत मविआ सरकारने अडीच वर्षे राज्याचे अतोनात नुकसान केले. दुसरीकडे विकास, उद्योगस्नेही धोरणे, कल्याणकारी योजना आखत महायुती सरकारने राज्याला क्रमांक एक वर नेले आहे. पायाभूत क्षेत्रात अभूतपूर्व काम करत अटल सेतू, सागरी मार्ग, मेट्रो,समृद्धी मार्ग याद्वारे राज्याच्या विकासाला वेग दिला. आमच्या सरकारकडे देण्याची नियत आहे आणि नीती आहे म्हणूनच प्रत्येक घटक आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या सरकारच्या कामगीरीमुळे विरोधक बिथरले असून खोटेनाटे बोलत, असंबद्ध बरळत आहेत अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मविआ सरकारने आपल्या कार्यकाळात अनेक घोषणा आणि आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने पूर्ण न करता हात वर केले. महायुती सरकारच्या सर्व योजना कायमस्वरुपी असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या नाहीत. लाडकी बहीण योजनेला हात लावाल तर जनताच विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करेल अशी तंबीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्थगिती सरकार गेल्यानंतर मागच्या सव्वा दोन वर्षांत गती आणि प्रगती सरकारचे काम जनतेने अनुभवले आहे. विरोधक एकीकडे लाडकी बहीण योजनेवर टीका करतात, सरकारकडे पैसे नाहीत, निवडणुका झाल्या की योजना बंद होणार अशा अफवा पसरवत आहेत. महायुती सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. आमच्या सरकारच्या योजना कागदावरच्या योजना नसून प्रत्यक्षात भक्कम आर्थिक पाठबळ निर्माण करूनच आणलेल्या योजना आहेत असे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय अंमलात आला आहे. दिवसा वीज देण्याचे संपूर्ण नियोजन केले आहे. संपूर्ण नियोजन करूनच आम्ही शाश्वत स्वरुपाची मोफत वीज योजना आणली आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले. सिंचनक्षेत्रात अभूतपूर्व काम करत महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर 145 प्रकल्पांना मान्यता दिली. 22 लाख 73 हजार हेक्टर सिंचनक्षमता निर्माण केली आहे. मागेल त्याला सौरपंप योजनेमुळे फक्त 10 टक्के पैसे भरून शेतक-यांना सौरपंप मिळाल्याने 25 वर्षे वीजबिल येणार नाही. वैनगंगा-मळगंगा, नार-पार-गिरणा, दमणगंगा-पिंजाळ, दमणगंगा-एकदरे असे 4 नदीजोड प्रकल्प मंजूर करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखांच्यावर मराठा उद्योजकांना बळ मिळाले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की महायुती सरकारचे अभूतपूर्व काम पाहून विरोधक गडबडले आहेत, सर्वसामान्यांच्या जीवनात घडलेले बदल विरोधकांच्या पचनी पडत नसल्याने उठसूठ फेक नरेटिव्ह प्रस्थापित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. राज्य कर्जबाजारी, लाडकी बहीण योजनेबाबत खोटा प्रचार होत आहे. महायुती सरकारने समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांचे जीवन बदलणा-या असंख्य योजना आणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. आमच्या 2 कोटी 30 लाख लाडक्या बहीणींच्या खात्यात पाच महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत.लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणा-या आणि दूषणे देणा-यांना सांगतो की या योजनेसाठी आधी 10 हजार कोटी नंतर 35 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. ही योजना तात्पुरती नाही, असेही पवार यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech