मुंबई- मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात अनेक लिफ्ट बंद असल्यामुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वॉर्डमध्ये अडमिट केलेल्या रुग्णांबरोबर नातेवाईकांनाही मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने नवीन १३ लिफ्टचे साहित्य आणले. मात्र गेल्या सात महिन्यांपासून हे साहित्य धूळ खात पडून आहे.
परळ येथील केईएम रुग्णालयात दररोज ८ हजारांहून अधिक रुग्ण ओपीडीला येत असतात. यात एखाद्या आजाराचे निदान झाले तर त्या रुग्णाला उपचारासाठी दाखल केले जाते. केईएम रुग्णालयात १७ मजली नवीन इमारत असून या इमारतीत अनेक लिफ्ट बंद असल्याने रुग्णांसह कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचीही गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांना रुग्णांना जेवण, कपडे, कचरा, रुग्णांची ने-आण सतत करावी लागते. त्यामुळे सगळ्याचाच खोळंबा होतो.
दरम्यान,सध्या १३ लिफ्टपैकी चार लिफ्ट बसविण्याचे काम सुरू असून टप्प्याटप्प्याने उर्वरित लिफ्ट बसवण्यात येतील, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.