घोडबंदरवर आता गायमुख-फाऊंटन भुयारी मार्ग

0

ठाणे – घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शनपर्यंत भुयारी मार्ग आणि येथून भाईंदर उन्नत मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गावर होत असलेल्या वाहतुककोंडीबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार झालेल्या ‘एमएमआरडीए’ प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याने येत्या काळात येथील कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात चार पदरी मार्गिका असून, ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्याचा भाग व पुढील राष्ट्रीय महामार्गाचा भाग विस्तृत रुंदीचे आहेत. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडी होते. तसेच, या रस्त्याचा काही भाग घाट स्वरूपातील असून या भागात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने येथे वाहतूक संथगतीने होते. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी या रस्त्याच्या भागाचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. मात्र रस्त्याच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व दुसऱ्या बाजूला ठाणे खाडी असल्याने रस्त्याचे रुंदीकरण करणे अशक्य आहे. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग होणे गरजेचे होते.

भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागातही मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. मुंबई महापालिकेतर्फे वर्सोवा ते भाईंदर या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने भाईंदर ते घोडबंदर रोडपर्यंत येण्याकरिता अंतर्गत रस्त्याचा वापर करण्यात येणार असून, खाडी किनाऱ्यालगत असणारा खारफुटीचा भाग लक्षात घेता वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी भाइंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शनपर्यंत उन्नत मार्ग होणे गरजेचे आहे. यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन मंगळवारी झालेल्या ‘एमएमआरडीए’च्या बैठकीमध्ये वसई, फाऊंटन हॉटेल जंक्शन ते गायमुख या भागात भुयारी मार्ग बांधण्यासाठी, तसेच गायमुख ते वसई भुयारी मार्गाने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला विनाअडथळा जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल जंक्शन, वसई ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग निर्मितीसाठी ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech