अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ब्लू व्हेल चॅलेंजमुळे झाल्याचा संशय

0

वॉशिंग्टन- अमेरिकेत शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू हा ब्लू व्हेल चॅलेंज गेममुळेही झाला असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. या गेम मुळे अनेक मुलांनी आपला जीव गमावला असल्याचे आढळून आल्याचेही या अहवालात म्हटले आहे. ८ मार्च रोजी अमेरिकेतील मॅसाचुसेट्स विद्यापीठात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह मिळाला होता. लुटमार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त केला जात होता. मात्र आता या घटनेचा तपास आत्महत्येच्या शक्यतेने केला जात असल्याची माहिती ब्रिस्टल काउंटी डिस्ट्रिक्ट एटर्नीचे प्रवक्ते ग्रेग मिलियोट यांनी दिली.

पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिली नसली, तरी या आत्महत्येशी ब्लू व्हेल चॅलेंज या गेमचा संबंध असल्याचे म्हटले जात आहे. हा एक ऑनलाईन गेम असून, खेळणाऱ्या व्यक्तीला यात काही गोष्टी करण्याचे चॅलेंज दिलं जातं. या गेममध्ये ५० लेव्हल आहेत, ज्या टप्प्या-टप्प्याने अधिक अवघड होत जातात. या गेममधील सुरुवातीचे चॅलेंज किंवा टास्क अगदी सोपे असतात, मात्र नंतर नंतरच्या लेव्हलमध्ये खेळणाऱ्याला इजा पोहोचवतील असे चॅलेंज दिले जातात. या गेमवर बंदी घालण्याचा विचार आधी विचार भारत सरकारने केला होता. मात्र नंतर बंदी न घालता त्यात मार्गदर्शक सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान ब्लू व्हेल गेम आत्महत्येस प्रवृत्त करणारा असल्याने त्यापासून दूर राहण्याचे आवाहन आयटी मंत्रालयानं आपल्या मार्गदर्शक सूचनेत केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech