भाऊ शेलार यांच्या बलिदानाची हृदयद्रावक कहाणी
अजय शेलार : टिटवाळा
शहापूर तालुक्यातील श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर देवस्थान परिसरात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. काळू नदीवरील पूल व्हावा यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने लढा देणाऱ्या भाऊ शेलार यांना त्याच पुलाची समस्या मांडत असताना आपला जीव गमावला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
पांडवकालीन देवस्थान आणि त्याची पूल समस्या : गंगा गोरजेश्वर देवस्थान हे शहापूर, कल्याण, आणि मुरबाड तालुक्यांच्या सीमेवर काळू नदीच्या त्रिवेणी संगम पात्रात वसलेले जागृत देवस्थान आहे. मात्र, येथे साधा पूल नसल्याने देवस्थानाला जाण्यासाठी स्थानिक नागरिकांना आणि भाविकांना होडीतून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. पुलाच्या अभावामुळे परिसरातील लोकांना ३०-४० किमीचा वेढा मारून फेरा घालावा लागतो, या ठिकाणी जर पूल झाला तर हेच अंतर अवघ्या ४-५ किमीचे होईल. हीच समस्या गेली अनेक वर्ष असून यासाठी हिरघर, आसोले, असोसे, दहिवली, मढ, फळेगांव, हाल, उशीद शेई, शेरे व लगतच्या गावातील नागरिकांणी शासन दरबारी उंबरे झिजवले मात्र हा पूल झाला नाही .
हिरेघर गावातील भाऊ शेलार यांनी काळू नदीवर पूल व्हावा यासाठी तरुणांना एकत्र करून लढा उभारला. त्यांनी अनेक वेळा शासन दरबारी आणि स्थानिक प्रतिनिधींकडे पूल उभारण्याची मागणी केली. गुरुवारी दशक्रिया विधीच्या निमित्ताने होडीने प्रवास करताना होणाऱ्या संकटांची व्यथा मांडण्यासाठी भाऊ शेलार यांनी प्रसार माध्यमांना बोलावले होते. बातमी कव्हर करून पत्रकार परतले मात्र भाऊ शेलार हे मागून येत होते . परतत असताना भाऊ शेलार आणि काही ग्रामस्थ होडीतून प्रवास करत होते. यावेळी नदी पात्राच्या मध्यभागी होडी अचानक उलटली. होडीत सुमारे सात ते आठ जण होते. त्यापैकी सर्व जण जीव वाचवण्यात यशस्वी झाले, पण भाऊ शेलार मात्र पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. भाऊ शेलार यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर या कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे. ज्यासाठी भाऊ शेलार लढा देत होते, त्यासाठीच त्यांनी आपला जीव गमावला, ही अतिशय दुःखद घटना आहे.