ठाणे : सतीश प्रधान आणि ठाणे शहर यांचे अतूट नाते होते. ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष, पहिले महापौर अशी त्यांची ओळख. त्यामुळे सतीश प्रधान हे नाव ठाणे आणि ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले, विशेष म्हणजे शहराच्या विकासाला योग्य दिशा दिली. त्याचेच फलित म्हणजे आजचे ठाणे होय. राम गणेश गडकरी रंगायतन असो, दादोजी कोंडदेव स्टेडियम असो, या वास्तु सतीश प्रधान यांची या शहराला देणगीच आहे.
याशिवाय विविध योजना, उपक्रम, कला, क्रीडा, शिक्षण आदी क्षेत्रातील त्यांचे योगदान शहरासाठी आजही आदर्शवत आहेत. त्यांनी सुरू केलेली मॅरेथॉन म्हणजे एक माईल स्टोनच म्हणावा लागेल. माझे आणि त्यांचे वैयक्तिक संबंध अत्यंत मधुर होते. त्यांचे अनेक उपक्रम, योजना, प्रकल्प हे राजकारणापलिकडचे होते, त्यामुळे मी अशा उपक्रमात सहभागी असायचो. शहरातील शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. ठाण्यातील मुलांना शिक्षणासाठी मुंबईला जावे लागत असे. अशा वेळी त्यांनी ज्ञानसाधना कॉलेज सुरू केले. या कॉलेजमधून ठाण्यातील मुलांना विविध शाखांचा अभ्यास करण्याची सोय झाली. त्यांचे निधन हे ठाणेकरांना चटका लावून जाणारे आहे. मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबतर्फे आणि भाजपातर्फे श्रद्धांजली वाहतो.