ठाणे – मा. भारत निवडणूक आयोगाकडील दि.२० जून २०२४ रोजी दिलेल्या निर्देशानुसार ०१ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमामध्ये मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दि.२१ जून,२०२४ व दि. २७ जून, २०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविल्याप्रमाणे सुधारीत कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रका प्रमाणे करण्यात येणार आहे. निवडणूका न्याय्य व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारयाद्यांचे अद्यावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते.
त्यानुषंगाने दि.२५ जुलै २०२४ ते दि.०९ऑगस्ट २०२४ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीमध्ये मतदारांनी आपले नाव मतदारयादीत आहे की नाही याची तपासणी करावी. तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींची मतदारयादीत नावाची नोंद नसल्यास नमुना नंबर ६. ज्या मतदारांच्या नावात / पत्त्यात दुरूस्ती असल्यास नमुना नंबर ८ तसेच कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत / कायमस्वरुपी स्थलांतरीत असल्यास नमुना नंबर ७ भरण्यात यावा.
तसेच दि.२७ जुलै २०२४ (शनिवार), दि.२८ जुलै २०२४ (रविवार), दि.३ ऑगस्ट २०२४ (शनिवार) व दि.४ऑगस्ट २०२४ (रविवार) या दिवशी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसेच विशेषतः असंरक्षित आदिवासी गट (Particularly Vulnerable Trible Groups-PVTGs) अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी आणि मतदारयादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.