ठाणे – करिअर घडवतानाही छंद जोपसता येतात. मात्र त्यात गफलत करू नका. आपल्या पालकांनी मोठया कष्टाने तुम्हाला घडवले आहेत. त्यांची जाण ठेवत योग्य कार्यक्षेत्र निवडा. कार्यक्षेत्र कोणतेही निवडत असला तरी एकाग्रतेने परिश्रम करा, सोशल मिडीयाच्या मागे न धावता स्क्रीनटायमिंग कमी करा… खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यशाची ही गुरुकिल्ली पत्रकारांच्या पाल्यांना दिली. निमित्त होते दहावी बारावीत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे.
ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव आयोजित केला जातो. कोव्हिड काळात बंद झालेला हा उपक्रम पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी पुन्हा सुरू केला आहे. शनिवारी ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. दहावी शालंत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तनिष्का वाजपेयी, प्रांजली मोरे, ऋग्वेद घरत, उमैमा अन्सारी, सिद्धार्थ पांडे तर बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अथर्व गुंडे, कीर्ती कनोजिया, पद्मजा शिंदे, दुर्वा आचार्य, रिथिक्षा शेट्टी आदी विद्यार्थांचा सत्कार खासदार नरेश म्हस्के, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सन्मान चिन्ह, रोख रक्कम, पुस्तक आणि प्रमाणपत्र असे या गौरवाचा स्वरुप होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, पत्रकार दिवसभर बाहेर फिल्डवर बातमीच्या शोधात काम करत असतात. अनेक पत्रकारांचा संघर्ष आपण पाहिला आहे. त्यांच्या खडतर परिश्रमामुळे फलीत म्हणून तुमचा आज गुणगौरव होत आहे. त्यांचे हे कष्ट कधी विसरू नका. करिअर घडवताना उदरनिर्वाह होईल आणि ताठ मानेने समाजात जगता येईल असे क्षेत्र निवडा असे ते म्हणाले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीही सोशल मिडीयाचा योग्य वापर कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले. सर्व क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनमधून जितके ज्ञान मिळवता येईल तितकेच घ्या, बाकी वापर टाळा असा सल्ला दिला. तसेच एकाग्र पद्धतीने परिश्रम घेतले तर स्वप्न नक्की पूर्ण होती ही यशाची गुरुकिल्ली दिली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी, ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ, अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, खजिनदार विभव बिरवटकर, सचिव निलेश पानमंद सह सचिव गणेश थोरात आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. पत्रकार संघाचे सदस्य अनुपमा गुंडे, अमर राजभर, सचिन देशमाने, अशोक गुप्ता, प्रफुल गांगुर्डे, पंकज रोडेकर आणि संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी यांनी केले.
पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी
ठाण्यातील पत्रकारांना योजनेतून जी घरे मिळाली होती. मात्र एका ना हरकत प्रमाणपत्रामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दूर केली. त्यामुळे या कार्यक्रमाचे औचित्य साधत पत्रकारांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते ना हरकत प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच पत्रकारांच्या वैद्यकीय विम्याच्या नुतनीकरणाचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्रेही यावेळी वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या रास्त मागण्या यापुढेही पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्त राव यांनी दिले. तर पत्रकारांच्या विस्तारित कक्षासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी सुचना देत अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी प्रशासनाला दिले.