ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहिर झाल्या आहे. या योजनेसाठी प्रभागसमितीनिहाय अर्जाचे वितरण सुरू असून 23 ऑगस्ट 2024 पर्यत अर्ज वितरीत केले जाणार आहेत. तर दिनांक 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येतील. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती, मुले, महिला यांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागातील दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकातील दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी दरवर्षी विविध योजना राबविण्यात येतात. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजनांमध्ये ‘दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती’, ‘दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती’, ‘दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना जिल्हास्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती’, ‘दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना राज्यस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती’, ‘दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना राष्ट्रीयस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती’, ‘दिव्यांग व्यक्ती / विद्यार्थी यांना आंतरराष्ट्रीयस्तर खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती’, ‘दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह करण्याकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे’, ‘दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे’, ‘दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करणेकरिता निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (NEFT/RTGS/ECS) द्वारे जमा करणे’, ‘दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चाकरिता निधी उपलब्ध करुन देणे’, ‘दिव्यांग बेरोजगारांना भत्ता / अर्थसहाय्य देणे’, ‘दिव्यांग व्यक्तींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे’, ’60 वर्षावरील दिव्यांगाना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे’, ‘दिव्यांग व्यक्तींच्या बचतगटांना अर्थसहाय्य देणे’, ‘कुष्ठरुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे’, ‘निरामय आरोग्य विमा योजनेची कार्यवाही करणे (गतिमंद, आत्ममग्नता, मेंदूचा पक्षाघात झालेली व्यक्ती व बहुविकलांग व्यक्ती यांचेकरिता)’ या विविध योजनांचा समावेश आहे. या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकडे किमान 40 % दिव्यांग असल्याबाबतचा दाखला असणे आवश्यक आहे.
सदर योजनांचे अर्ज ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागसमिती कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. दिनांक 24 जुलै ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्जांचे वितरण केले जाईल. तर दिनांक 25 जुलै ते 26 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.