ठाणे – प्रत्येक निवडणुकीत पोलीस दलाने नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे काम केलेले आहे. लोकसभा निवडणुकांप्रमाणे येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्येही सर्व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन नि:पक्षपातीपणे व जबाबदारीने काम करावे, असे मार्गदर्शन कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या निर्देशाप्रमाणे आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हास्तरीय पोलीस अधिकाऱ्यांचे “कायदा व सुव्यवस्था” या विषयाबाबतचे प्रशिक्षण पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नोडल अधिकारी, कायदा व सुव्यवस्था दीपक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षण वर्गास जिल्ह्यातील सर्व उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही निवडणुकांमध्ये पोलीस प्रशासनाची महत्वाची जबाबदारी असते. निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीसुद्धा तैनात असतात, त्यामुळे मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. निवडणुकीची ड्यूटी ही कायद्याचे पालन करुन डोळ्यात तेल घालून करणे आवश्यक आहे. मॉक ड्रिल्स कधी घ्यावेत याचेही नियोजन करणे गरजेचे आहे. निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर लागणाऱ्या मशीन्सची याची जबाबदारी देखील पोलीसांवर असते व ती आपण काटेकोरपण पार पाडत असतो, त्यामुळे या निवडणुकीतही आपण सर्वजण ती निश्चितपणे पार पडणार आहोत, असा विश्वासही कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला.
निवडणूक कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याचीही दक्षता पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठांना कळवावी. तसेच मतदान केंद्रावर कोणतेही गैरव्यवहार होणार नाही, या दृष्टीने काम करावयाचे आहे, अशा सूचनाही यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.